सातपूर- गेल्या तीन वर्षात नाशिक जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रात विविध उद्योगात आगीच्या सुमारे २४ दुर्घटना घडल्या आहेत. या बाबत औद्योगिक सुरक्षा विभागामार्फत घटनांची चौकशी केली जाते, अहवाल तयार करून वरिष्ठांना पाठवले जातात पण त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जात नसल्यामुळेच अनेक उद्योजक निर्ढावल्याचे पाहायला मिळाले आहे. कामगार कायदे व औद्योगिक सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात असल्यामुळे कंपन्यांमध्ये होणाऱ्या दुर्घटनेत कामगारांचा नाहक बळी जात असल्याची भावना कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे.
वीसपेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांना औद्योगिक सुरक्षा कायदा लागू होतो. पूर्वी एखाद्या आस्थापनेच्या मालकाने व व्यवस्थापनाने सुरक्षेच्या उपाययोजना न केल्यामुळे चुकून अपघात झाला तर मालक व व्यवस्थापनावर खटला चालवण्यात येत होता. पण गेल्या पाच वर्षापासून यात औद्योगिक संघटनांनी विरोध केल्याने शासनाने बदल करून मालकांना सूट देण्याबरोबर केवळ दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत.
तसेच दर तीन- सहा महिने होणारी व्हिजिट बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे औद्योगिक सुरक्षेबाबत उपाययोजना करता येत नाही. त्यामुळेच अपघाताचे प्रमाण जास्त वाढताना पाहायला मिळते. ग्रामीण भागातील खासगी औद्योगिक वसाहती ज्या ग्रामपंचायतीअंतर्गत येतात, त्यांची आर्थिक क्षमता नसल्याने त्या भागात फायर ब्रिगेड, अॅम्बुलन्स, आरोग्य केंद्र हे देऊ शकत नाहीत. दुर्घटना झाली तर शहरातील सुरक्षा यंत्रणा येईपर्यंत मोठे नुकसान झालेले असते. त्यामुळे शासनाने याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील खासगी ठिकाणी या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली होती. त्यास प्राथमिक मान्यताही देण्यात आली होती, परंतु पुढे त्यात काहीही बदल झाले नाहीत. जिंदाल कंपनीत लागलेल्या आगीमुळे त्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत असून, त्यावर निर्णय होणे अपेक्षित असल्याचे कामगार संघटनांकडून बोलले जात आहे.
जिल्ह्यातील १९ अतिधोकादायक उद्योग
डेल्टा मॅगनेटस् लि., अंबड, स्थायसन कृप इलेक्ट्रिक स्टील इंडिया प्रा. लि. (वाडीवऱ्हे), सुदाल इंडस्ट्रीज लि. (एमआयडीसी अंबड), महिंद्र ॲन्ड महिंद्र लि. (सातपूर), बेलोटा ॲग्री सोल्यूशन प्रा. लि. (माळेगाव), हिंदुस्तान नॅशनल ग्लास इंड लि. (माळेगाव), भारत पेट्रोलियम (माळेगाव, ता. सिन्नर), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (माळेगाव, ता. सिन्नर), स्पेक्ट्रम इथेर्स लिमिटेड (रासेगाव, ता. दिंडोरी) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (पानेवाडी, ता. नांदगाव), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. एलपीजी बॉटलिग प्लॅंट (धोटाणे, मनमाड), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (पानेवाडी, मनमाड), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (पानेवाडी, मनमाड), स्टार गॅस कंपनी (विल्होळी, ता. नाशिक), जेपीएफएल फिल्मस प्रा. लि. (मुंढेगाव, ता. इगतपुरी), अक्षय इंडस्ट्रीज (स्टाइस, मुसळगाव, सिन्नर), शिवशाही फ्युल प्रा. लि. (शेनवड, ता. इगतपुरी), निफाड साखर कारखाना लि. (पिंपळस, ता. निफाड), के. के. वाघ सहकारी साखर कारखाना (रानवड, ता. निफाड).
या कंपन्यांमध्ये झाले अपघात
जिंदाल पॉलिफिल्म, मुंढेगाव एमआयडीसी, वागंदीपा ऑइल मिल (पालखेड), ग्रॅफाईट इंडिया (सातपूर), ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग (अंबड), भगवती स्टील (सिन्नर), हिंदुस्थान ग्लास (सिन्नर), हर्षल एन्टरप्रायजेस (दिंडोरी), आदिमा ॲग्रो (नाशिक) यासह इतर २४ कंपन्यांमध्ये आगीच्या घटना गेल्या तीन वर्षांत घडलेल्या आहेत.