नागपूर : मला मंत्रिमंडळात घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही त्यासाठी प्रयत्न केले. असे असले तरी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून मंत्री झालो आहे, असे राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झालेले छगन भुजबळ यांनी सांगितले.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच शहरात आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. राज्यात सरकार स्थापनेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मंत्री करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आमच्या पक्षाचा निर्णय झाला आणि माझी संधी हुकली. आता पक्षाने मंत्री करण्याचा निर्णय घेतला आणि मी मंत्री झालो, असे भूजबळ म्हणाले.
विरोधी पक्ष डागाळलेल्या नेत्याला मंत्रिमंडळात सामील करण्यात आल्याची टीका करीत आहे. त्याबाबत ते म्हणाले, मी टीका करणाऱ्या विरोधी पक्षांना सांगू इच्छितो की, मी न्यायालयाच्या आदेशानुसार निर्दोष आहे. आता पुन्हा-पुन्हा जुन्या प्रकरणाचे संदर्भ देत बदनाम करणे योग्य नाही.
मी महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी न्यायालायाने ८० पानांचा निकाल दिला. त्यात मला आणि इतर संबंधितांना निर्दोष ठरवण्यात आले आहे. तेव्हा त्या प्रकरणावरून टीका करणे योग्य नाही. महाराष्ट्र सदन बांधून तयार आहे. परंतु राज्य सरकारने त्याच्या कंत्राटदाराला अद्याप निधी दिलेला नाही, याकडे लक्ष वेधले.ओबीसी समाजाच्या प्रश्नाबाबत ते म्हणाले, मी सरकारमध्ये असो वा नसो.
ओबीसी समाजाच्या प्रश्नावर कायम लढा देत राहणार आहे. मंत्रीपदावर राहिल्यास तो लढा अधिक प्रभावीपणे लढता येतो. पण, मी मंत्री केवळ ओबीसींचा नाही. राज्यातील संपूर्ण जनतेचा आहे, असेही ते म्हणाले.