Donald Trump iPhone India: भारतात आयफोन निर्मिती सुरु करण्याच्या तयारीत असलेल्या अॅपलच्या अडचणी वाढत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना भारतात आयफोनचे उत्पादन करु नका, असे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. परंतु टिम कुक आपल्या निर्णयावर ठाम आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी आता टेक कंपन्यांना धमकी दिली आहे. त्यासाठी टॅरिफचे अस्त्र काढले आहे. अमेरिकेत तयार न होणाऱ्या स्मार्ट फोनला 25 टक्के टॅरिफ लावण्यात येणार आहे. त्यामध्ये अॅपलच्या आयफोनचाही समावेश आहे. तसेच युरोपीय संघाच्या आयातीवर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर माहिती शेअर करताना म्हटले की, मी ॲपलचे सीईओ टिम कुक यांना सांगितले होते की, अमेरिकेत विकले जाणाऱ्या आयफोनची निर्मिती अमेरिकेतच झाली पाहिजे. हे आयफोन भारतात किंवा इतर देशामध्ये तयार करण्यात येऊ नये. अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या आयफोनला कमीत कमी 25 टक्के टॅरिफ द्यावा लागणार आहे. टीम कुक यांनी भारतात ॲपलचे उत्पादन सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ट्रम्प यांनी आयफोनचे उत्पादन अमेरिकेतच झाले पाहिजे, असा इशारा दिला होता. अमेरिकेबाहेर तयार झालेले कोणतेही उत्पादन टॅरिफशिवाय विकू शकणार नाही. स्मार्टफोनवरील टॅरिफ अॅपल, सॅमसंगसह इतर टेक कंपन्यांना जूनच्या अखेरीस लागू होऊ शकेल.
अॅपलने चीनमधून त्यांच्या आयफोन असेंब्लीचा प्लॅन्ट भारतात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आयफोनचे उत्पादन अमेरिकेत करण्याची त्यांची योजना नाही. त्याबाबत विश्लेषकांनी म्हटले आहे की अमेरिकेत आयफोनचे उत्पादन केल्याने किंमती शेकडो ते हजारो डॉलर्सने वाढतील.
युरोपियन युनियनने मागील वर्षी अमेरिकेला 500 अब्ज डॉलर किमतीच्या वस्तू निर्यात केल्या. त्यामध्ये जर्मनी, आयर्लंड आणि इटली यांचा वाटा मोठा होते. परंतु ट्रम्प यांना आता त्यावर 50 टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्या देशांतील कार, औषधनिर्माण आणि विमाने यासारख्या उत्पादनांना मोठा फटका बसणार आहे. तसेच अमेरिकन ग्राहकांचा खर्च वाढणार आहे.