बीसीसीआय निवड समिताने आज 24 मे रोजी आगामी इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. निवड समितीने इंग्लंड दौऱ्यासाठी 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी या खेळाडूची नावं सांगितली. तसेच शुबमन गिल याची टेस्ट कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याला उपकर्णधार करण्यात आलं आहे.आगरकर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान ही घोषणा केली. तसेच आगरकर यांनी टीम इंडियाचा प्रमुख आणि मॅचविनर बॉलर जसप्रीत बुमराह याच्याबाबत मोठी अपडेट दिली.
टीम इंडियाला 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. टीम इंडिया या मालिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप 2025-2027 साखळीची सुरुवात करणार आहे. मात्र त्याआधी आगरकर यांनी टीम इंडियासाठी चिंताजनक अपडेट दिली आहे. बुमराह या मालिकेतील सर्व सामने खेळू शकणार की नाही? याबाबत शंका आहे. तसेच बुमराह 3 सामने खेळणार की 4? हे काळच ठरवेल”, असं आगरकरने सांगितलं.
“मला वाटत नाही की बुमराह पाचही कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध असेल”, असं आगरकर यांनी म्हटलं. बुमराहने संघ जाहीर करण्याआधीच पाचही सामने खेळण्यासाठी सक्षम नसल्याचं बीसीसीआयला कळवलं होतं. बुमराहने वर्कलोड मॅनेजमेंटमुळे सर्व सामने खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता आगरकर यांनी संघ जाहीर केल्यानंतर बुमराहबाबत अपडेट दिली.
जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज आहे. बुमराहने टीम इंडियाला आतापर्यंत अनेकदा सामने जिंकून दिले आहेत. बुमराह ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरिजमधील सर्व 5 सामने खेळला होता. मात्र बुमराहला सिडनीत झालेल्या पाचव्या सामन्यात दुखापत झाली होती.
बुमराहला दुखापतीमुळे सिडनी कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात बॉलिंग करता आली नाही. बुमराहला पाठीत सूज आली होती. बुमराहवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे बुमराहला क्रिकेटपासून काही महिने दूर रहावं लागलं होतं. तसेच बुमराहला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला मुकावं लागलं होतं. त्यामुळे बुमराहने खबरदारी म्हणून इंग्लंड दौऱ्यात सर्व सामने खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आगरकर यांनीही त्याबाबत माहिती दिली. त्यामुळे आता बुमराह या मालिकेत किती सामने खेळणार? हे तेव्हाच स्पष्ट होईल.