Justice Abhay Oka : निवृत्तीच्या दिवशी दिले अकरा निकाल, न्या. अभय ओक ठरले अपवाद
esakal May 24, 2025 12:45 PM

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश निवृत्तीच्या अखेरच्या दिवशी सहसा कोणताही निकाल देत नाहीत. मात्र न्या. अभय ओक हे त्याला अपवाद ठरले आहेत. आईच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी न्या. ओक गुरुवारी मुंबईला गेले होते. त्यानंतर निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी त्यांनी दिल्ली गाठत ११ खटल्यांचा निकाल दिला. न्यायिक क्षेत्रात न्या. ओक यांनी दिलेल्या योगदानाचा सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासह अन्य मान्यवरांनी गौरव केला.

‘उत्कृष्ट न्यायाधीश आणि असाधारण सहयोगी’ अशा शब्दांत सरन्यायाधीश गवई यांनी न्या. ओक यांचा निरोप समारंभात गौरव केला. न्या. ओक यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे घटनेच्या मूळ तत्त्वांचे संरक्षण झाले. ‘आईचे निधन झालेले असूनही ते एका दिवसात कामावर परतले. वडिलांचे निधन झाले होते, तेव्हाही ते फक्त एक दिवसाची सुटी घेत कामावर परतले होते,’ अशी आठवण गवई यांनी सांगितली.

‘न्यायाधीशांनी कठोर असावे’ 

सत्काराला उत्तर देताना न्या. ओक म्हणाले,‘‘न्यायाधीशांनी कठोर आणि दृढ असले पाहिजे. लोकप्रियता मिळवण्याचा त्याने प्रयत्न करू नये.’’ तर, आपल्या निर्णयांच्या माध्यमातून न्या. ओक यांनी स्वतंत्रता, भाषण आणि अभिव्यक्तीच्या संरक्षणासाठी अथक प्रयत्न केले. मजबूत कणा असलेले न्यायाधीश अशी त्यांची ओळख होती, असे ॲटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी नमूद केले. आम्ही विरोधी पक्षात होतो. मात्र तरीही तुमच्याबद्दलचे प्रेम आणि सन्मान कधीही कमी झाला नाही, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आपल्या भाषणात सांगितले. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, गोपाल शंकरनारायणन, मेनका गुरुस्वामी, मीनाक्षी अरोरा, माधवी दिवाण, गुरु कृष्णकुमार, सी. यू. सिंह, सिद्धार्थ लुथरा, अपराजिता सिंह, शेखर नाफडे, मुकूल रोहतगी यांचीही यावेळी भाषणे झाली.

न्या. ओक यांचा प्रवास

मुंबई विद्यापीठात कायद्याची पदवी घेतल्यानंतर न्या. ओक यांनी १९८३ मध्ये ठाण्यात वकिली व्यवसायास सुरुवात केली होती. ऑगस्ट २००३ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले. याच न्यायालयात ते २००५ मध्ये कायम न्यायाधीश झाले. मे २०१९ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्या. ओक यांची नियुक्ती झाली होती, तर ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती मिळाली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.