शुभंकर तावडे आणि ऋतुजा बागवे
कधी कधी नात्यांना नावाची गरज नसते. त्या नात्यांची रेशीम गुंफण इतकी सहज आणि सच्ची असते, की ते नातं नुसत्या हास्यातून, गप्पांतून, आणि एकमेकांच्या सहवासातूनच समोर येतं. असंच एक रेशीमनातं आहे अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री ऋतुजा बागवे यांचं. ‘अंधारमाया’ या आगामी हॉरर सिरीजच्या निमित्तानं दोघंही एकत्र येत आहेत. ही सिरीज ३० मे रोजी ‘झी5’ वर प्रदर्शित होणार आहे. मालिकेमध्ये ते सहकलाकार असले, तरी प्रत्यक्षात त्यांच्यातली मैत्री ही काळाच्या परीक्षेत उतरलेली, घट्ट आणि प्रामाणिक आहे. थिएटरच्या पार्श्वभूमीतून आलेल्या या दोघांची ही मैत्री केवळ सहकार्यासाठी नाही, तर एकमेकांप्रती असलेल्या आदर, विश्वास आणि आपुलकीवर उभी आहे.
ऋतुजा सांगते, ‘‘मी यापूर्वी शुभंकरसोबत प्रत्यक्ष काम केलं नव्हतं; पण मी त्याच्या एकांकिका पाहिल्या होत्या. त्यानेही माझं काम पाहिलं होतं. मी त्याच्या बाबांसोबत आधी काम केलं आहे, त्यामुळे मी त्याला पूर्वीपासून ओळखते. शुभंकर कमालीचा अभिनेता आहे. एकांकिका हे आमच्यासाठी जिव्हाळ्याचं माध्यम आहे. त्यामुळे आमच्या बोलण्यात अनेक वेळा याच गोष्टींचा उल्लेख असतो. ‘अंधारमाया’मध्ये आमची पात्रं नवरा-बायकोची असल्याने एकत्र अनेक सीन होते. गंमत म्हणजे आम्ही चांगले मित्र असल्याने त्यातला बॉंड आम्हाला वेगळा तयार करावा लागला नाही. आम्ही एकमेकांच्या कामाची पद्धत, स्वभाव चांगल्या प्रकारे ओळखतो. त्यामुळे आमचं मैत्रीचं नातं अधिक दृढ वाटतं.’’
शुभंकर म्हणतो, ‘‘ऋतुजा ही माझी कॉलेजमधली सीनियर आहे. आमची ओळख तेव्हा झाली जेव्हा मी तिचं एक नाटक पाहिलं आणि तिच्या अभिनयानं मी खूप इम्प्रेस झालो. तिची एकांकिका, नाटकं, ‘अनन्या’मधलं काम मी पाहिलं आणि अभिनेत्री म्हणून मला तिचा प्रचंड आदर वाटतो. तिचा प्रोफेशनॅलिझम, शिस्तबद्ध स्वभाव - या सगळ्यांमुळे माझ्या मनात तिची एक आदरयुक्त प्रतिमा तयार झाली आहे आणि माझ्या मते, त्यातूनच आमची मैत्री झाली. आम्ही दोघंही थिएटर बॅकग्राऊंडमधून असल्यानं आमची काम करण्याची पद्धत, विचारसरणी यात फार साम्य आहे. त्यामुळे आमचं गिव्ह अँड टेक उत्तम जुळलं. मजा आली.’’
ऋतुजा सांगते, ‘‘शुभंकर खूप फन लव्हिंग, काळजी घेणारा, आणि हाय एनर्जी असलेला माणूस आहे. त्याची स्टोरी टेलिंगची पद्धत कमाल आहे. त्याचं काही सांगणं इतकं रंगतदार असतं, की समोरचं माणूस ती गोष्ट इमॅजिन करायला लागतं. हे मला शिकायला नक्की आवडेल. मी मात्र गोष्ट सरळ सांगते. आम्ही दोघंही खवय्ये असल्याने ‘अंधारमाया’च्या शूटदरम्यान कोकणात असताना मासे हा आमचा आवडता विषय झाला होता. संध्याकाळी सात वाजले, की आमचे कॉल सुरू व्हायचे – आज काय ऑर्डर करायचं! एकदा सावंतवाडीत शूट चालू असताना त्याने बांगडा मागवला आणि नंतर पैसे देताना त्याला समजलं, की बांगडा ७० रुपयांना मिळाला. एवढं त्याला अप्रूप वाटलं की पुढचे दोन दिवस तो तेच सांगत होता!’’
शुभंकर म्हणतो, ‘‘ऋतुजा फार प्रेमळ मुलगी आहे. ती कोणालाही कमी लेखत नाही. सगळ्यांशी आदराने बोलते. तिची कामावरची निष्ठा वाखाणण्याजोगी आहे. ती स्वतःवर विश्वास ठेवते. तिचा आत्मविश्वास आणि कामावरचं प्रेम, हे सगळं खूप शिकण्यासारखं आहे. आम्ही खाणे या विषयावरून खूप गप्पा मारतो. आमच्या स्वभावातला एक विरोधाभास म्हणजे मी माणसांची फिरकी घेतो, त्यावर ती प्रचंड हसते. तिला हसू आवरत नाही, त्यामुळे तिच्यासमोर असं काही बोलणं कठीण होतं!’’
ऋतुजा शेवटी म्हणते, ‘‘माझ्यासाठी मैत्री म्हणजे कम्फर्ट आणि खरेपणा. जे दोन्ही मला शुभंकरकडून मिळतात. मला त्याचं काही पटलं नाही, तर मी मोकळेपणाने मत देते आणि सेम तोही करतो. हीच माझ्यासाठी मैत्रीची व्याख्या आहे।’’
शुभंकर म्हणतो, ‘‘मैत्रीला मी आयुष्यात खूप वरचं स्थान देतो. माझ्यासाठी कुटुंबीयांइतकीच माझी मैत्रीसुद्धा खास आहे. एकदा कोणाला मी मित्र म्हणालो, की ती मैत्री कायमची असते. कामामुळे दुरावा आला तरी भेटल्यावर तोच बॉण्ड राहतो. माझ्यासाठी मैत्री ही आयुष्य परिपूर्ण करणारी गोष्ट आहे।’’
(शब्दांकन : मयूरी गावडे)