HDFC AMC देणार प्रत्येक शेअरवर 90 रुपये लाभांश, रेकॉर्ड तारीखही केली निश्चित
ET Marathi May 24, 2025 03:45 PM
मुंबई : एचडीएफसी एएमसीने जानेवारी-मार्च २०२५ तिमाही आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ चे निकाल (HDFC AMC q4 results) जाहीर करताना लाभांश देखील जाहीर केला होता. कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष २०२५ साठी शेअरहोल्डर्सना प्रति शेअर ९० रुपये अंतिम लाभांश (HDFC AMC final dividend ) देण्याची शिफारस केली आहे. आता यासाठी रेकॉर्ड तारीख ६ जून २०२५ निश्चित करण्यात आली आहे. आहे. ज्या शेअरहोल्डर्सची नावे कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजच्या नोंदींमध्ये या तारखेला शेअर्सचे लाभार्थी म्हणून आढळतील त्यांना लाभांश मिळण्यास पात्र असेल.अंतिम लाभांशावर भागधारकांची मंजुरी येत्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) घेतली जाईल. एचडीएफसी एएमसीने शेअर बाजारांना कळवले आहे की त्यांची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २५ जून २०२५ रोजी होणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत अंतिम लाभांशावर भागधारकांची मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे पेमेंट ३० दिवसांच्या आत केले जाईल. कंपनीने २०२४ च्या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर ७० रुपये अंतरिम लाभांश आणि ७० रुपये अंतिम लाभांश दिला होता. एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे शेअर्स (HDFC AMC share price) २३ मे रोजी बीएसईवर ०.५८ टक्क्यांनी वाढून ४८१०.८५ रुपयांवर बंद झाले. कंपनीचे मार्केट कॅप १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गेल्या २ वर्षात या शेअरमध्ये १७२ टक्के आणि ३ महिन्यांत २७ टक्के वाढ झाली आहे. २ आठवड्यात किंमत १२ टक्क्यांनी वाढली आहे. एप्रिलमध्ये, कंपनीच्या तिमाही निकालांनंतर, ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंटच्या शेअर्ससाठी प्रति शेअर ५,००० रुपयांची लक्ष्य किंमत दिली होती.ब्रोकरेजने म्हटले होते की, बाजारपेठेतील कमकुवत भावना असूनही मार्च २०२५ मध्ये उद्योग स्तरावरील एकूण एसआयपी प्रवाह तिमाही आधारावर केवळ २% कमी झाला. तर वार्षिक आधारावर २५% वाढला. प्रवाहाच्या ट्रेंडमध्ये वाढ होण्याबाबत व्यवस्थापन आशावादी आहे. कंपनीचा एसआयपी प्रवाह घट उद्योगाच्या सरासरीपेक्षा कमी होता. जानेवारी-मार्च २०२५ या तिमाहीत एचडीएफसी एएमसीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर १८ टक्क्यांनी वाढून ६३८.५ कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण महसूल २०.५ टक्क्यांनी वाढून १,०२५.५ कोटी रुपये झाला. संपूर्ण आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये, कंपनीचा निव्वळ नफा २६.६४ टक्क्यांनी वाढून २,४६० कोटी रुपये झाला आणि एकूण उत्पन्न २८ टक्क्यांनी वाढून ४,०६० कोटी रुपये झाले.