कोळवण : नांदगाव येथील शंकर तुकाराम पेरणेकर या शेतकऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. त्यामुळे पौड ग्रामीण रुग्णालयाबाबत आक्रोश व्यक्त केला जात आहे.
याबद्दल स्वराज्य पक्षाने पौड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. स्वराज्य पक्षाच्या तालुका अध्यक्ष राजू फाले यांच्यासह शिवसेनेच्या स्वाती ढमाले, ज्ञानेश्वर डफळ, प्रमोद बलकवडे, नामदेव टेमघरे, किसन फाले आणि नांदगाव ग्रामस्थ यांनी पौडच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला.
नांदगाव (ता. मुळशी) येथील पेरणेकर (वय ५५) या शेतकऱ्याला शेतात काहीतरी चावले असे वाटले म्हणून त्याने पौड ग्रामीण रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करून घेत त्यादृष्टीने उपचार सुरू केले. संध्याकाळी पेरणेकर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुणे येथील ससून रुग्णालयात नेण्यात आले.
यावेळी स्वतः डॉ. विद्या कांबळे रुग्णालयात पेरणेकर रुग्णासोबत रुग्णवाहिकेतून गेल्या होत्या. ससूनमध्ये गेल्यावर तेथील डॉक्टरांनी पेरणेकर यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यावर पेरणेकर यांच्या नातेवाइकांनी पौड ग्रामीण रुग्णालयात चुकीचे उपचार झाल्याचा ठपका ठेवला.
मंगळवारी (ता. २०) पेरणेकर यांच्यावर नांदगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नंतर संबंधित रुग्णाच्या नातेवाइकांनी, ग्रामस्थांनी पौड येथील शासकीय रुग्णालयात या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेऊन त्यांनी रुग्णावर काय उपचार केले आणि चालत-बोलत असलेला रुग्ण अचानक अत्यवस्थ कसा झाला आणि त्याचा मृत्यू कसा झाला अशा प्रश्नांची सरबत्ती केली. रुग्णावर केलेल्या उपचारांवर नातेवाइकांनी आक्षेप घेतला असून पौड येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणा झाल्याचा आरोपही केला आहे.
शंकर पेरणेकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अतिदक्षता विभागाची गरज भासणार होती. म्हणून त्यांना रुग्णालयातील डॉ. विद्या कांबळे ससून रुग्णालयात रुग्णवाहिकेतून घेऊन गेल्या. परंतु ससून येथील डॉक्टरांनी पेरणेकर यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. आम्ही आमच्या परीने रुग्णाला उपचार देण्याचा प्रयत्न केला होता.
- डॉ. मीना इसवे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय पौड