Accident News: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात! सात वाहने एकमेकांवर आदळली; दोन महिलांचा मृत्यू
esakal May 25, 2025 03:45 AM

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज एक अत्यंत भीषण अपघात घडला. यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४ ते ५ जण जखमी झाले आहेत. अपघात खोपोली हद्दीत, मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर झाला. सात वाहनांची एकमेकांवर आदळ होऊन मोठा अनुचित प्रकार घडला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात एक ट्रक, तीन मोटारकार्स आणि तीन खाजगी बसेस यांच्यात घडला. घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका भरधाव ट्रकने आय 10 आणि अर्टिगा या दोन गाड्यांना जोरात धडक दिली. यात अर्टिगा गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. तर आय 10 कार ट्रक आणि रोड डिव्हायडरमध्ये चिरडली आहे. परिणामी इतर गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि ७ वाहनांचा साखळी अपघात झाला.

या अपघातातील मृत आणि जखमींची नावे समोर आली आहेत. यात अश्विनी अक्षय हळदणकर आणि श्रेया संतोष अवताडे यांचा मृत्यू झाला आहे. या दोघींचा मृत्यू अपघातस्थळीच झाला. त्यांचे मृतदेह वाहनांमध्ये अडकलेले होते. बचाव पथकाने प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढले. तर या घटनेत ४ ते ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली. त्यांना तातडीने एमजीएम हॉस्पिटल, कामोठे आणि खोपोली नगरपालिका रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

काही जखमींवर शस्त्रक्रिया सुरू आहेत. यातील काही जखमींची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर काही मिनिटांतच महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, IRB ट्रॅफिक पथक, आणि हेल्प फाउंडेशनचे स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेमुळे वाहतूक कोंडी झाली होती. ट्राफिक जॅम सोडवण्यासाठी रस्ता एकेरी करण्यात आला. वाहनांना बाजूला करून क्रेनच्या साहाय्याने मार्ग मोकळा करण्यात आला.

अपघातामुळे मुंबईकडे जाणारी लेन काही वेळ पूर्णपणे बंद ठेवावी लागली. एकेरी वाहतूक केल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास झाला. रस्ता पूर्णपणे सुरळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अतिवेग आणि चालकाचा ताबा सुटणे हे प्राथमिक कारण मानले जात आहे. ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सीसीटीव्ही फूटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांवरून पुढील तपास पोलीस करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.