गौरी देशपांडे - gaurisdeshpande1294@gmail.com
नुकताच २१ मे ला, आपण जागतिक चहा दिवस साजरा केला. गेले काही दिवस पाऊसही भेटीला येतोय. पाऊस पडल्यावर लगेच सोशल मीडियावर गरम-गरम भजी आणि चहाचे वाफळते कप यांचे फोटो आणि रील्स पावसाच्या सरींपेक्षा जास्त वेगाने आणि जास्त संख्येने कोसळू लागले! टपरीवरचा काचेचा ग्लास (एकात चहा आणि दुसरा ग्लास पहिल्याच्या खाली चटका न बसता नीट धरता यावं म्हणून), वाफा आणि त्यात तपकिरी - सोनेरी रंगाचा मध्यम गोड, सुगंधित मसाला चहा! आहाहा! नुसता फोटो पाहिला, तरी आपल्या मेंदूत साठवलेला त्याचा गंध आणि चव जाणवते! आलं, वेलची, तुळस, गवती चहा कुटून घातलेला व भरपूर उकळलेला मसाला चहा! या निमित्ताने वाटलं आज ही गोष्ट सांगायलाच हवी - मसाला चहाची गोष्ट!
दक्षिण भारतातल्या एका छोट्या खेड्यात राहत होती एक मुलगी. नाव तिचं बुलबुली आणि स्वभाव एकदम चुलबुली. एकदम उत्साही आणि चपळ होती ती! दिवसभर ती तिच्या दोस्तांसोबत गावाभोवती पसरलेल्या जंगलात हुंदडत बसायची. तिला सगळ्यात काय आवडायचं माहीतय? रोज पहाटे वाऱ्यासोबत आलेला जंगलाचा तो विशिष्ट वास- ज्यात पानांचा, फुलांचा, मातीचा असा मिश्र गंध असायचा!
बुलबुलीचा एक खास मित्र होता. तोताराम! हा पोपट रोज बुलबुलीला भेटायला येई आणि जंगलातल्या, दूर देशी राहणाऱ्या माणसांच्या, त्याच्या सफरींच्या गोष्टी सांगे. त्या गोष्टी ऐकताना बुलबुलीचं भान हरपून जाई. तोतारामने सांगितलेल्या सर्व ठिकाणांना भेट द्यावी असं तिला मनोमन वाटायचं, कल्पनेत ती तिथे जाऊनही यायची, पण मग गोष्ट संपायची आणि तिला वाईट वाटायचं! तिच्या मनात यायचं, ‘आपण अद्याप ‘विचित्ररूप स्थळ’सुद्धा पाहिलं नाही. सगळे जण या जागेविषयी बोलत असतात. ऐकलेल्या गोष्टींवरून हे स्थळ गूढ वाटतं. आधी तिथे तरी जाऊन यायला हवं.’
एक दिवस नेहमीप्रमाणे तोताराम येणार म्हणून ती वाट बघत होती, पण तोताराम आलाच नाही. तिने घरातली रोजची कामंही संपवली, पण त्याचा काही पत्ताच नाही. शेवटी ती वडाच्या झाडाखाली भरणाऱ्या तिच्या शाळेत गेली. ती शाळेत जाऊन बसली, पण तिचं लक्षच लागेना. त्यांची मैत्री झाल्यापासून तोताराम भेटला नाही असा एकही दिवस गेला नव्हता. तो दिवस गेला, पुढचाही गेला. असे अनेक दिवस गेले तसं बुलबुलीला तोतारामची काळजी वाटू लागली. ‘त्याला काही दुखापत तर नसेल ना झाली?’
काही काळानंतर अचानक एके दिवशी भल्या पहाटे थकलेल्या तोतारामने बुलबुलीला उठवलं. ‘‘बुलबुली ऊठ. जंगलामध्ये भांडण सुरू झालंय. विचित्ररूप स्थळ आता पूर्वीसारखं राहिलं नाही. आपल्याला काही तरी करायला हवं.’’ बुलबुलीने तोतारामसोबत विचित्ररूप स्थळाला जायचं ठरवलं. ती जागा बुलबुलीच्या गावापासून दोन दिवस आणि दोन रात्र लांब होती. प्रवास मोठा आणि अवघड असणार होता. पण बुलबुली डगमगली नाही. तिने निश्चय केला होता. ती म्हणाली, ‘‘माझी इच्छाशक्ती माझ्या पावलांपेक्षा मोठी आहे.’’
बुलबुली आणि तोताराम निघाले विचित्ररूप स्थळाकडे! अनेक तास बुलबुली चालत होती. चालता चालता ती थकून गेली. तिला तहान आणि भूकसुद्धा लागली. लवकरच ती दोघं नारळाच्या झाडांजवळ पोहोचली, तेव्हा तोतारामनं एक जोरदार शीळ घातली आणि पाहते तर काय! एक खोडकर माकड कुठून तरी समोर प्रकटलं. तोताराम म्हणाला, ‘‘बंदरू, झाडावरून एक दोन शहाळी तोडून खाली टाक ना. माझ्या मैत्रिणीला- बुलबुलीला खूप भूक लागलीय रे!’’ बंदरूने लगेच दोन गोड पाणी असलेली शहाळी खाली टाकली. त्यातलं पाणी पिऊन, मलई खाऊन बुलबुली अगदी तृप्त झाली आणि ते पुढच्या प्रवासाला निघाले. जेव्हा जेव्हा बुलबुलीला थकल्यासारखं होई, तेव्हा तेव्हा ती विचित्ररूप स्थळाचं चित्र मनात उभं करण्याचा प्रयत्न करत असे आणि स्वतःचा उत्साह टिकवून ठेवत असे. त्यांच्या प्रवासाचा पहिला दिवस संपला. बुलबुली एका झाडाखाली निजली. दुसऱ्या दिवशी पहाटे हजारो पक्ष्यांची किलबिलाटानं तिला जाग आली. तिचा आवडता जंगलाचा मिश्र गंध आज अजून तीव्रतेने जाणवत होता. बुलबुली खुश झाली. त्यांनी पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. बरंच अंतर चालत पार केल्यावर बुलबुली थकली, पण लवकरच त्यांना भेटला एक खळाळता झरा. त्याचं पाणी पिऊन आणि चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारून तिला हुशारी वाटली. तितक्यात तोतारामनं तिच्या हातावर लालबुंद, चविष्ट बोरं ठेवली. आहा! बोरांमुळे बुलबुलीचे पुढचे काही तास मजेत गेले, पण आता मात्र तिची शक्ती संपत आली होती. तोतारामच्या हे लक्षात आलं आणि त्याने पुन्हा एकदा शीळ घातली. या वेळी एक हत्ती हलत डुलत त्यांच्या जवळ पोहोचला. तोतारामनं त्याला बुलबुलीला पाठीवर बसवण्याची विनंती केली. हत्ती आनंदाने तयार झाला. बुलबुलीला विश्रांती तर मिळालीच, पण हत्तीच्या पाठीवरून जंगल काय दिसत होतं! हत्तीकडून मजेदार किस्से ऐकता ऐकता संध्याकाळ झाली. रात्रीसाठी तिघांनी गुहेचा आसरा घेतला. तिसऱ्या दिवसाची सकाळ उजाडली आणि तोतारामनं नाश्त्याला म्हणून बुलबुलीला जांभळं आणून दिली!
आता प्रवासाचा शेवटचा टप्पा! जसं जसं विचित्ररूप स्थळ जवळ येत होतं, तसं तसं बुलबुली अधिक अधीर होऊ लागली. काही वेळात हत्ती थांबला आणि त्याने बुलबुलीचा निरोप घेतला. हो! कारण त्याच्या कळपापासून त्याला फार वेळ लांब राहून चालणार नव्हतं. जाता जाता तो म्हणाला, ‘‘तुला जंगलातलं युद्ध थांबवता आलं तर बरं होईल. जंगल हेच आमचं घर आहे.’’
आता ते त्या रस्त्यावर आले जो जातो विचित्ररूप स्थळाकडे. त्या रत्याच्या जवळ जाताना एक विचित्र आवाज जंगलात घुमू लागला! ते जसे पुढे जात होते तसा तो आवाज मोठा होऊ लागला! हा तर युद्धाचा आवाज जे तीन जंगलांमध्ये सुरू होतं! कानावर हात ठेवून बुलबुली पुढे पुढे जाऊ लागली. काही पावलानंतर ती एका सपाट प्रदेशात पोहोचली. तिची नजर जाईल तिथवर पर्वतरांगा होत्या. हे ते विचित्ररूप स्थळ! Senseless Point! बुलबुली अधाशी नजरेनं सगळीकडे पाहत होती! तिला आता सगळीकडे गवताचे हिरवेगार गालीचे दिसत होते. इतकं विहंगम दृश्य तिनं कधीच पाहिलं नव्हतं! ती आल्याचं कळल्यासारखं हळू हळू जंगलांमधला तो कर्कश आवाज क्षीण होत गेला. तिने आता एक दीर्घ श्वास घेतला. तिला चहाचा वास आला! ‘‘आहा चहा!’’तिने पुन्हा एक मोठा श्वास घेतला, तेव्हा उजवीकडून ओळखीचा जरासा उग्र असा वास आला! ‘‘अरे ही तर वेलची!’’ ती डावीकडे वळली आणि तिने श्वास घेतला तर ताजा सुंदर वास आला! ‘‘तुळस!’’ एकाच स्वराच्या तीन सप्तकांप्रमाणे हे तीन सुवास होते. बुलबुली त्या सुवासांनी नादावून गेली. तेवढ्यात तुळस आणि वेलची म्हणाल्या, ‘‘तू त्या चहाच्या रोपांना आमचा सुगंध चोरण्यापासून रोखू शकशील? त्यांना चांगली शिक्षा दे आणि!’’
चहा म्हणाला, ‘‘हे दोघं नसते तर माणसानं आमच्या सुगंधाचा आनंद लुटला असता.’’ आता बुलबुलीला समजलं की, हे युद्ध सुगंध चोरीला जाण्याच्या भीतीपोटी सुरू झालेलं आहे! तिला वाटलं वेडीच आहेत ही रोपं. मी जिथे उभी आहे तिथे या तिघांचा किती सुंदर वास मला येतोय याची त्यांना कल्पना नाही. चहाचं म्हणणं होतं की, त्याच्या आजूबाजूला वाढणाऱ्या सगळ्याच पानांचा त्याला वास येतो. तुळस आणि वेलचीच्या मध्ये त्याचा स्वतःचा टिकवून ठेवणं त्याला अजून कठीण होऊन बसतं. तो वास चोरत नाही. तुळस आणि वेलचीचं म्हणणं होतं की त्या रानटी रोपं असल्यानं त्यांच्या वाढीवर त्यांचं काहीच नियंत्रण नसतं आणि वाऱ्याने त्यांचा सुगंध कुठल्या दिशेने वाहून न्यावा तेही त्यांच्या हातात नसतं.
‘‘आता काय करावं बरं? आयडिया!’’बुलबुलीनं तोतारामला काही तुळशीची, काही वेलचीची आणि काही चहाची पानं घेऊन यायला सांगितली. मग तिने ती हलक्या हाताने चोळली आणि वास घेतला तेव्हा तिच्या तोंडून आपसूक ‘‘आहा!’’ असा आनंदाचा उद्गार आला! ती म्हणाली, ‘‘माझ्या हातमध्ये तुम्ही तिघंही आहात आणि तुमचा एकत्रित येणार वास हा या जगातला अद्वितीय वास आहे. याशिवाय तुमच्यातले औषधी गुण सगळ्या प्राण्यांना-पक्ष्यांना माहीत आहे. त्यामुळे आता तुम्ही शांततेचं सफेद निशाण फडकवा आणि दोस्ती करून टाका बरं! कारण तुम्ही तिघं एकत्र बेस्ट आहात, कळलं?’’
तिचं बोलणं संपल्यावर पुन्हा एकदा जंगलांतून आवाज येऊ लागला, पण तो युद्धाचा नव्हता तर हसण्याचा होता! सगळ्यांचा निरोप घेऊन बुलबुली निघाली. हां, जाताना भरपूर वेलची, तुळस आणि चहा बरोबर न्यायला ती अजिबात विसरली नाही! तुळस आणि वेलची घातलेल्या अप्रतिम चहाची ओळख तिला सगळ्यांना करून द्यायची होती नं!
Jungle Brew या नावाने हे पुस्तक मूळ इंग्रजी भाषेत तान्या लूथर अगरवाल यांनी लिहिलं आहे. याचा मराठी अनुवाद सुचेता कडेठाणकर यांनी केला आहे. गोड बुलबुली, तिचं घर, तिचा तोतरामसोबतचा धाडसी प्रवास, आणि एकमेकांशी भांडणारी चहाची, तुळशीची आणि वेलचीची रोपं जिवंत होऊन आपल्याला भेटतात संजय सरकार यांच्या चित्रांतून. हे पुस्तक ‘प्रथम बुक्स’ यांनी प्रकाशित केलं आहे. या तिघांची भांडणं सोडवताना एक गोष्ट मात्र बुलबुलीला कळली! एकेकट्या केलेल्या कामापेक्षा मिळून केलेल्या कामाची चव खासच वाढते! सुर्रर!