गिरिजा दुधाट
dayadconsultancies@gmail.com
शस्त्रवेध : शस्त्र ते शास्त्र
भारताच्या संघर्षमय इतिहासात परकीय आक्रमणांसोबत
तद्देशीय आणि एतद्देशीय संस्कृतींमधली तांत्रिकदृष्ट्या प्रगत, युद्धांसाठी परिणामकारक अशी शस्त्रं दोन्ही बाजूंच्या संस्कृतींनी स्वीकारली. परकीय आक्रमणं, विदेशी व्यापार, आंतराराष्ट्रीय भेटवस्तू यांमधून भारताची शस्त्रसंस्कृती वैविध्यसंपन्न झाली. असेच एक शस्त्र भारतमध्ये थेट चीनवरून आले, ते होते ‘दाव’/‘दाओ’ तलवार.
‘दाव’चा अर्थचिनी भाषेत ‘दाओ’/‘दाव’चा अर्थ होतो ‘एकधारी तलवार’. ‘दाव’ संज्ञा तशी खासकरून एकधारी तलवारीला आणि सामान्यपणे कुठल्याही एकधारी शस्त्रासाठी वापरली जाते. दाओ तलवारीचा चीनमधला इतिहास अगदी आठव्या-नवव्या शतकांपर्यंत मागे जातो. मूळची चीन मधली असणारी ‘दाओ’ तलवार व्यापार, चिनी लोकांचे स्थलांतर, सीमालगत भागांतून होणारे सांस्कृतिक आदान-प्रदान अशी मजल-दरमजल करत बाराव्या-तेराव्या शतकात भारतात आली. हे शस्त्र युद्ध अथवा संघर्षांपेक्षा सांस्कृतिक देवाण-घेवाणीतून, पारंपरिक युद्धकलांमधून भारताच्या शस्त्रसंस्कृतीत रूजल्याने याचे लिखित ऐतिहासिक पुरावे फारसे आढळत नाहीत. दाव तलवार ही तिबेटो-बर्मन कुळातली सांगितली जाते. दावच्या या तिबेटो-बर्मन कुळात बर्मा, थायलंड मधली ‘धा’ तलवार, चीनमधली ‘दाओ’ लाओसची ‘दाब’ अशा रूपसाधर्म्य असणाऱ्या तलवारींचा समावेश होतो.
‘दाव’चा प्रसारदाओ तलवार बर्मन, थाई, युनान प्रांतातले चिनी लोक यांच्यासोबत भारतात आल्यावर ईशान्य भारताच्या आसाम, नागालँड, मिझोराम, मणिपूर या राज्यांमध्ये स्थिरावली. दाव तलवारीचा प्रसार ईशान्य भारतात झाला तरीही हिला मुख्य शस्त्र म्हणून स्वीकारलं ते नागालँडमधल्या ‘नागा’ लोकांनी. युद्ध, शेतीकाम आणि सांस्कृतिक-धार्मिक विधी अशा सर्व ठिकाणी या तलवारीचा वापर केला जाई (अजूनही होतो). नागा समाजात आओ, सेमा, संगतम, अंगामी अशा लहान-मोठ्या मिळून सोळा पोटजाती आहेत. या प्रत्येक पोटजातीच्या ‘दाव’ तलवारीची रचना, स्वरूप थोडेसे वेगळे आहे. दाव तलवारीचे तीन मुख्य भाग असतात. पहिला असतो ‘पाते’, ज्याला ‘लिखांग’ किंवा ‘खांग’ म्हटलं जातं. ही पाती चांगल्या प्रतीच्या लोखंडापासून बनवली जातात. दुसरा भाग म्हणजे ‘नोकलांग’ किंवा ‘वाम’ म्हणजे ‘मूठ’. दाव तलवारीची मूठ ही रचनेने अतिशय साधी आणि बांबूच्या मुळापासून बनवली जाते. दंडगोलाकार असणाऱ्या या मुठीला काही वेळा चांगल्या पकडीसाठी वेताच्या कामट्या लावलेल्या असतात. तिसरा भाग म्हणजे ‘सैखुंग’ किंवा ‘वुंगखुंग’, तलवारीचे म्यान.
नागालँडमधील ‘दाव’नागालँडमध्ये ‘दाव’ तलवार ही तिथल्या ‘अकी कीती’ या पारंपरिक युद्धकलेमध्ये, सुमी नागा लोकांकडून शिकार, युद्धांमध्ये आजही वापरली जाते. नागा लोकांमध्ये दोन गटांत वादविवाद झाल्यास वाटाघाटी करताना दोन गटप्रमुखांच्या दाव तलवारींची आपापसात अदला-बदली केली जाते. नागा लोकांच्या दाव तलवारीवर तांब्याचे नक्षीकाम मोठ्या प्रमाणात केलेले असते. या तांब्यामध्ये उ:शापाची शक्ती असते अशी या लोकांची धारणा आहे. या तलवारीच्या खाली काही वेळेस हरीण, बोकड, अगदी ठार मारलेल्या शत्रूचे केससुद्धा बांधलेले असतात.
नागा लोकांमध्ये हे केस शौर्य आणि शक्तीचे प्रतीक मानले जातात. ‘दाव’ तलवारीमध्येच आणखी एक सांस्कृतिक दुवा आहे, तो म्हणजे ‘राम दाओ’, दाओ कुळातली बळीप्रथेसाठीची तलवार. आता दावकूळ आहे, तलवारही आहे म्हणजे तीसुद्धा नागालँडमधलीच असणार असं वाटलं असणार ना? पण थांबा, ‘राम दाओ’ आहे ती मूळची नेपाळी जन्माची आणि त्यानंतर बंगाल प्रांतात प्रसार झालेली..पण मग तिचं नाव ‘दाव’ कसं? आणि ती खरंच भारतीय म्हणायची का? भारतीय शस्त्रजगताचा पसारा हा एकूणात अवघड विषय आहे, त्याबद्दल नंतर कधीतरी. आतापुरती, ‘राम दाव’. तर, ही राम दाव बंगाल, आसाम या भागात ‘काली मातेची तलवार’ म्हणून ओळखली जाते. या दावची रचना प्राचीन मूर्त्या किंवा ग्रंथांमध्ये दिसणाऱ्या ‘खङग’ कुळातल्या तलवारीशी बरीच मिळती-जुळती असते. राम दाव ही फक्त बळीप्रथेसाठी वापरली जाणारी ‘विधी’ची तलवार आहे, युद्धासाठीची नाही.
वैशिष्ट्येया तलवारीचं वैशिष्ट्य म्हणजे या रूंद पात्याच्या तलवारीला टोकाच्या भागात प्राण्यांचे, विशेषकरून गेंडा, रेडा यांच्या तोंडाचे आकार दिलेले असतात आणि मुख्य म्हणजे या तलवारीला आपल्यासारखे दोन ‘डोळे’ असतात. तलवारीच्या अग्राजवळ दोन बाजूंना कोरलेले डोळे हे ‘शक्ती’ चे प्रतीक मानले जातात. शस्त्र वापरणाऱ्याचे वाईट नजरेपासून संरक्षण व्हावे म्हणून तलवारीला ही ‘शक्ती’ पूर्ण नजर दिली जाते. बोकड, रेडा यांच्या बळीसाठी वापरल्या जाणाऱ्या या तलवारीवर काली मातेच्या उग्र रूपाची स्तुती करणाऱ्या पुराणातल्या, स्तोत्रांमधल्या ओळी लिहिलेल्या असतात. नेपाळ, बंगाल, आसाम या पलीकडे राम दाव वापरली जात नसल्याने तिच्याबद्दल भारताच्या बाकी भागांमध्ये फारशी माहिती नाही.
आधुनिक संदर्भआजच्या काळात आपण ढाल-तलवारींच्या युद्धांमधून बाहेर पडलो असलो, तरी त्यांच्या सांस्कृतिक परंपरा मात्र आजही अनेक ठिकाणी जागृत आहेत. आधुनिक भारतीय लष्करामध्ये पारंपरिक शस्त्रे आणि आधुनिक शस्त्रे यांचा उत्तम मेळ घातलेला आहे. भारतीय सैन्यातल्या विविध दलांमध्ये ‘कुकरी’, ‘किरपाण’ शस्त्रांचा वापर द्वंद्व शस्त्रांमध्ये, सांस्कृतिक विधींमध्ये आजही केला जातो. ‘दाओ’सुद्धा भारतीय लष्कराच्या ‘नागा रेजिमेंट’चा एक अविभाज्य भाग आहे. ‘दाव’ तलवार किंवा चाकू नागा रेजिमेंटमधले सैनिक पोशाखाचा आणि परंपरेचा भाग म्हणून अभिमानाने वापरतात. नागा रेजिमेंटचे सैनिक भारतीय सैन्यात ‘हेड हंटर्स’ म्हणून ओळखले जातात. नागा लोकांच्या युद्धपरंपरेत शत्रूचे मुंडके विजयाची खूण म्हणून कापून आणण्याची आणि जपून ठेवण्याची प्रथा दीर्घ काळ अस्तित्वात होती. त्यांच्या या ‘दाव’ तलवारीने फक्त नागा राज्यातच नाही, तर अगदी कारगिल युद्धापर्यंत आपली छाप उमटवली आहे!
कारगिल’मधील वापरझालं असं, की १९९९ च्या भारत-पाकिस्तानच्या कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याने पॉईंट ४८७५ वर ताबा मिळवला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी २ नागा रेजिमेंटच्या तुकडीला तैनात करण्यात आलेल्या तुकडीमध्ये ‘इम्लीअकुम ऑ’ नावाच्या तरूण सुभेदाराने त्यांच्या इतर साथीदारांसोबत पंधरा हजार फुटांवर असलेल्या, आधुनिक शस्त्रास्त्रांनी खच्चून भरलेल्या पाकिस्तानी तळावर दिवसाढवळ्या हल्ला केला. इम्लीअकुमने मागचा पुढचा विचार न करता समोरून चालून आलेल्या दोन बंदूकधारी पाकिस्तानी सैनिकांवर त्यांच्याकडे असलेल्या ‘दाव’ तलवारीने हल्ला चढवला आणि दोघांची मुंडकी दावने छाटून त्या तळावर विजय मिळवला! एखाद्या शस्त्रासोबत येणारी त्याच्या पारंपारिकतेची आणि वीरवारशाची सांस्कृतिक शक्ती आधुनिक काळातही ते शस्त्र वापरणाऱ्या व्यक्तीमागे उभी राहू शकते याचे ‘दाव’ तलवार हे उत्तम उदाहरण आहे.
सर्वसमावेशक शस्त्रसंस्कृतीमाणसाची वैचारिक शक्ती ही मोठी चमत्कारिक गोष्ट आहे. एकदा का तिने एखादा परिसर, संकल्पना, किंवा वस्तू ‘आपली’ मानली की, त्यामधले देशी-विदेशी, भौगोलिक अंतरे वगैरे भेद गळून पडतात. माणसाच्या किंवा माणसांच्या समूहाने स्वीकारलेल्या तद्देशीय वस्तू, संकल्पनांवर काळानुरूप स्थानिक धर्म, संस्कृती, परंपरा यांची पुटे चढत जातात. काही वेळेस या वस्तू, संकल्पना यांचं एतद्देशीय तादात्म्य हे त्यांच्या मूळरूपाकडे त्रयस्थपणे बघता यावं इतकं भिन्न झालेलं असतं. दाओ तलवारीच्या चिनी उगमापासून भारतामध्ये तिचं ‘राम दाव’पर्यंत होत गेलेलं शस्त्रांतर हे इथल्या सर्वसमावेशक शस्त्रसंस्कृतीचं द्योतक आहे. देश-संस्कृतीगणिक केवळ नामसाधर्म्य राहून मूळ रूपगुणांशी फारकत घेणाऱ्या ‘दाव’सारख्या शस्त्रांचं होत जाणारं जन्मांतर अभ्यासणं हा एक तृप्त करणारा सांस्कृतिक अनुभव असतो.