एन. के. खांबेटे - editor@esakal.com
पार्श्वगायन करणाऱ्या गायक-गायिकांच्या माहितीचे केवळ संकलन असे या पुस्तकाचे स्वरूप नाही. १८२ गायक-गायिकांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडींसह त्यांचा संघर्ष, त्यांच्या गाजलेल्या गाण्यांची यादी अशी सविस्तर माहिती देत पोरे यांनी हिंदी चित्रपटसंगीतविश्वाचा वेध घेतला आहे. आपल्याकडे हिंदी चित्रपटांबद्दल माहिती कमीच ठेवली जाते. त्यामुळे आठ-दहा नावांच्या पलीकडे कोणाला माहिती नसते.
येथे छोट्या -छोट्या बाबी नोंदवत अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून काम करीत असताना ज्या थोड्याफार मंडळींनी थोडेफार गायन केले त्यांचीही सविस्तर माहिती मिळते; त्याचबरोबर सरस्वती राणे, नसीम बानू, राजकुमारी अशा विस्मरणात गेलेल्या गायिकांच्या कर्तृत्वाची माहितीदेखील येथे मिळते. मराठी अभिनेत्री शशिकला यांना नूरजहाँ हिने गाण्यासाठी आवाज दिला होता. दुसऱ्या अभिनेत्रीसाठी तिने प्रथमच असे गायन केले होते. एखाद्या गायिकेचे नाव लहानपणी वेगळे होते आणि मोठेपणी तिने वेगळ्या नावाने कसे गायन केले, तसेच कविता कृष्णमूर्तीचे आधीचे नाव शारदा होते, तर किशोरी आमोणकर यांनी चित्रपटांसाठी एकच गाणे गायले अशी वेगळी माहितीही या पुस्तकातून मिळते.
हिंदी चित्रपट संगीताबद्दल अधिकारवाणीने बोलणारे बरेच असतात. गाण्यांच्या आठवणींमध्ये रमणारे बरेच असतात; पण प्रत्येकाकडे गायक किंवा गायिकांची ठोस माहिती असतेच असे नाही. हा कोश ही उणीव दूर करेल. नव्या गायकापासून ते अगदी कुंदनलाल सैगल यांच्यापर्यंतच्या मागील पिढीतील गायकांपर्यंत माहिती देणाऱ्या या कोशात, ज्यांनी पाच ते सहा गाणी गायिली आहेत अशा गायक आणि गायिकांचीदेखील माहिती आहे.
प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी त्यांच्या गाजलेल्या गाण्यांची यादी दिल्यामुळे वाचक नकळतपणे त्या काळात जातो. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर प्रदीर्घ असा लेख या कोशात आहे. लेखक यातील अनेक गायक व गायिकांना प्रत्यक्ष भेटला आहे. त्यामुळे काही जणांची माहिती देताना आजपर्यंत प्रसिद्ध न झालेली माहितीही मिळते, तसेच लेखकाचे त्यांच्याबद्दलचे निरीक्षणही वाचायला मिळते. चित्रपट, चित्रपट क्षेत्रातील विविध घडामोडी यांबद्दल फारसे गांभीर्याने आपल्याकडे लेखन होत नाही. कोश वाङ्मय तर हिंदी चित्रपटांबद्दल कमीच आहेत. हे पुस्तक त्यामध्ये नक्कीच मोलाची भर घालते.
पुस्तकाचे नाव : स्वरसागर
लेखक : स्वप्निल पोरे
प्रकाशक : प्रतीक प्रकाशन, पुणे
(९४२२३१८२४९, ९४०४२३२२२७)
पृष्ठे : ७२४ मूल्य : ८०० रुपये