Satara News: फलटण तालुक्यात खळबळ! 'बरड भागात कृषी केंद्रांवर कारवाई'; खतांची विक्री बंदचे आदेश, दुकानदारांची पळापळी
esakal May 25, 2025 01:45 PM

दुधेबावी : फलटण तालुक्यातील कृषी निविष्ठा भरारी पथकाने आंदरुड, बरड, जावली व वडले भागातील कृषी सेवा केंद्रांवर कारवाई केली. यामध्ये दोन लाख नऊ हजार ८६० रुपये किमतीच्या रासायनिक खतांची विक्री बंद करण्याचे आदेश तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड व पंचायत समितीचे कृषी अधिकारी नवनाथ फडतरे यांनी दिले.

शेतकऱ्यांनी बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खतांची खरेदी करताना परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, असे श्री. गायकवाड यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘कृषी निविष्ठा खरेदी करताना दुकानदारांकडून पक्की पावती घ्यावी, तसेच गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच निविष्ठा खरेदी करावी, बनावट भेसळयुक्त कीटकनाशकाची खरेदी टाळण्यासाठी कीटकनाशकांचे वेस्टन, खरेदीची पावती व त्यातील थोडे कीटकनाशक जपून ठेवावे.

कमी वजनाच्या निविष्ठा, तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. खतांच्या खरेदीची पावती पिकांची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी. भेसळीची शंका दूर करण्यासाठी खताची पाकिटे व गोणी सीलबंद मोहोरबंद असल्याची खात्री करावी. कमी वजनाच्या निविष्ठा, तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विभाग पंचायत समिती यांच्याकडे संपर्क साधावा.’’

बियाणे कीटकनाशके व रासायनिक खते खरेदी करताना परवानाधारक कृषी निविष्ठाविक्रेत्याकडूनच खरेदी करावी खरेदी केलेल्या निविष्ठाची पक्की पावती घ्यावी.

- दत्तात्रय गायकवाड, तालुका कृषी अधिकारी, फलटण.

कोणत्याही दुकानदाराने बियाणे व रासायनिक खतांची विक्री करताना शेतकऱ्याची अडवणूक करू नये, तसेच जादा दराने विक्री करू नये, असे आढळल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

- नवनाथ फडतरे, गुणनियंत्रण निरीक्षक, पंचायत समिती, फलटण.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.