मुंबई : दहिसरमध्ये मित्रांचा वाद थेट जीवावर उठल्याचे समोर आले आहे. दहिसर येथील गणपत पाटील नगरात १४ मे रोजी रात्री घरालं भीषण आग लागल्याची घटना घडली होती. सुरुवातीला अपघाताने आग लागल्याचा अंदाज होता. मात्र आरोपींनी या घराला हेतुपुरस्सर आग लावल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. शुल्लक कारणावरून घर पेटवून देत संपूर्ण कुटुंबाच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी चार तरुणांविरोधात गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
गणपत पाटील नगरात राहणाऱ्या जुली केवट (वय ४०) आणि त्यांचे कुटुंबीय १४ मेच्या रात्री झोपेत होते. मात्र मध्यरात्री अचानक घरात धूर पसरला आणि सर्वांना जाग आली. आग लागल्याचे समजताच सारे जीवाच्या भीतीने घराबाहेर पडले. या आगीत केवट यांचे घर, संसार आणि दुचाकी वाहन जळून खाक झाले. अग्निशमन दल या आगीची चौकशी करत असतानाच केवट कुटुंबीयांच्या हाती परिसरातील सीसीटीव्ही चित्रण लागले.
यामध्ये त्यात परिसरात राहणाऱ्या देवराज पाटील (वय २२) आणि त्याचे तीन साथीदारांनी केवट यांच्या दुचाकीला आणि नंतर घराला आग लावल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने हत्येचा प्रयत्न या कलमान्वये नोंदवून पाटीलला बेड्या ठोकल्या. तर त्याच्या तीन साथीदारांचा शोध सुरू आहे.
बदला घेण्याच्या हेतूने कृत्यकेवट यांचा मुलगा लकी आणि पाटीलचा मित्र शादाब यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. परिसरातील एका व्यक्तीला परस्पर भेटण्यावरून हा वाद झाला. त्यानंतर शादाबने लकीला धमकावले होते. बदला घेण्याच्या हेतूने हे कृत्य केल्याची माहिती अटक आरोपीकडील प्राथमिक चौकशीतून पुढे आल्याचे सांगण्यात आले.
या वृत्तास दुजोरा देताना वरिष्ठ निरीक्षक गणेश पवार यांनी सांगितले, अटकेतील आरोपी पाटील सराईत असून त्याच्या विरोधात अनेक गुन्हे नोंद आहेत. त्याच्या फरार तीन साथीदारांनाही लवकरच अटक केली जाईल.