पुणे : हवामान विभागाकडून जास्त पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे, त्यामुळे ज्या दिवशी मुसळधार पाऊस होईल तेव्हा कोथरूडमध्ये कोठेही पाणी तुंबू देऊ नका. पाणी वाहून गेले पाहिजे याकडे लक्ष द्या असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. तसेच, पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्या त्वरित सोडविण्यासाठी कोथरूड मतदारसंघात एक समन्वय अधिकारी नेमावा, अशी सूचनाही पाटील यांनी केली.
कोथरूड मतदारसंघातील पावसाळापूर्व कामांचा आढावा पाटील यांनी आज घेतला. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त आशा राऊत, अविनाश संकपाळ, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त गणेश सोनुने, भाजपचे कोथरूड मंडल अध्यक्ष नीलेश कोंढाळकर, कुलदीप सावळेकर आदी उपस्थित होते.
या बैठकीत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी यांनी पुणे शहरासह कोथरूड भागातील पावसाळी पूर्व कामांची माहिती दिली. शहरात एकूण २०१ मुख्य नाले असून त्यापैकी १५ नाले हे कोथरूड मतदारसंघातून वाहतात. या नाल्यांची सफाई ८० टक्के पूर्ण झाली असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण होतील असेही पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.
नालेसफाईवर नाराजीचंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत नाले सफाईच्या कामावर नाराजी व्यक्त करत ही कामे व्यवस्थित केली जात नाहीत असे नमूद केले. कोथरूडसह पुणे शहरातील नाले सफाईची कामे जलदगतीने पूर्ण करा. कोथरूड मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी १०० स्वयंसेवक नेमा. त्यासोबतच, महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या पावसाळा पूर्व कामांची पाहणी २४ तासांत अहवाल सादर करावा, अशा सूचना कोथरूड मधील सर्व माजी नगरसेवकांना पाटील यांना दिल्या.