Maharashtra Farmers : पशुधनाचे भाव कडाडले...! खते बियाणांच्या सरबराईसाठी पशुधन बाजारात
esakal May 25, 2025 09:45 PM

पाचोड : ऐन पेरणीच्या हंगामात खते व बियाणांच्या सरबराईसाठी शेतकरी जीवापाड जपलेले दावणीचे पशुधन विक्रीसाठी बाजारात घेवुन येत असल्याने गुरांचा आठवडे बाजार ऐन पेरणीच्या तोंडावर फुलल्याचे चित्र रविवारी (ता.२५) पाचोड (ता.पैठण) येथे पाहवयास मिळाले.

गत सात-आठ वर्षातील कधी कोरड्या तर कधीच्या ओल्या दुष्काळीस्थितीला विस्मूर्ती च्या गर्तेत ढकलून शेतकऱ्यांनी रखरखत्या उन्हात खरीप पेरणीपूर्व मशागती आटोपल्या. हवामान खात्याकडून यंदा वेळेवर पावसाचे संकेत मिळाल्याने तो भांबावला. सलग आठ- दहा वर्षापासून अत्यल्प तर कधी अतिवृष्टीमुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला. गेल्या हंगामात गारपिट व अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होऊन शेतकरी नागवला गेला. बँकेचे घेतलेले पिककर्ज वेळेवर भरले गेले नाही. खाजगी सावकारांचे, दुकानदारांचेही मागील देणे फिटले नसल्याने शेतकऱ्यांची पत संपली. त्यातच दिवसेंदिवस कपाशीचे क्षेत्र वाढल्याने चाराटंचाई निर्माण झाली.

एकंदरीत अशातच खरीप हंगाम डोक्यावर येऊन ठेपला व खते, बी-बियाणांची चिंता भेडसावू लागली. काळया आईची ओटी भरण्यासाठी सावकाराचे उंबरठे झिजविण्यापेक्षा जीवापाड दावणीला जोपासलेले पशुधन बाजारात नेण्यास त्यांनी पसंती दर्शविली. बाजारात बैलांसह दुभत्या गाई, म्हशींची मोठ्या प्रमाणात आवक होऊन एरवी कवडी मोल किंमतीत विक्री होणारे पशुधन पेरणी च्या तोंडावर, दुष्काळी स्थितीतही भाव खात आहे. तुर्तास बाजारात गुरांच्या किंमती कडाडल्या आहेत. बाजारात हजारांवर बैल, पाचशेवर गाई-म्हशी, दोन हजारांवर शेळ्या विक्रीस आल्या होत्या. यांत खिल्लारी, सोटरी,गीर, गावरान आदीचा समावेश होता. साधारण एक बैल जोडीची किंमत सत्तर हजारांपासून एक लाखांपर्यंत असल्याचे पाहवयास मिळाले .

येथे गत पन्नास- साठ वर्षापासून गुरांचा आठवडे बाजार भरतो. या बाजारात नगर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरहून मोठया प्रमाणात व्यापारी गुरांच्या खरेदी -विक्रीसाठी येतात. व्यापाऱ्यांसह पंचक्रोशीतील शेतकरीही बैल खरेदीसाठी येथे येतात. परंतु आता पेरणीच्या तोंडावर जनावरांचे भाव आकाशाला भिडल्याने फारसे ग्राहकी नसल्याचे चित्र जाणवले.

विठ्ठल हनुवते (पशुपालक, टाकळी ) : "प्रत्येकजण कपाशीवर भर देत असल्याने चारा - वैरणीचा प्रश्न गंभीर बनला आहे. तूर्तास जनावरांची प्रकृती बऱ्यापैकी असल्याने चार पैसे येऊन खते व बियाणांचा प्रश्न मार्गी लागेल म्हणून चार बैलांपैकी दोन बैल बाजारात आणले. मात्र साठ - सत्तर हजारांवर कुणी किंमत देत नसल्याने बैल जोडी परत नेत आहे."

अंगद लेंभे (रा. मुरमा), "पेरणीपूर्व कामे आटोपली.आता पेरणीसाठी बैलांची गरज आहे. रोजंदारीने पेरणीची कामे करता येईल. परंतु आज बियाणे खतांसाठी पैशाची आहे त्याचे काय? "

अन्सार पटेल (रा.रांजनगाव दांडगा)," पेरणीसाठी बैल घेण्यासाठी बाजारात आलो. मात्र किंमती खूपच कडाडल्या आहेत. सत्तर हजारात बैलजोड मागितली.परंतु बैलमालक ऐंशी हजारापेक्षा कमी देत नाही. गतवर्षी पेरणीच्या वेळी बैल विकले. वर्षभर ट्रॅक्टरने शेती केली. मात्र बैलाशिवाय पर्याय नसल्याने पुन्हा बैलासाठी बाजारात आलो."

शामदभाई (व्यापारी)," या वर्षी पाऊस पाणी बऱ्यापैकी असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यातच मृगापूर्वीच पावसाने हजेरी लावून दिलासा दिल्यामुळे गुरांच्या किंमती वाढल्या असून बरेच जण पाऊस पाणी बरा राहीला, शेती पिकली तर बैल - गाय कापसावर पुन्हा घेऊ म्हणून वेळ मारून नेत आहे."

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.