खापा : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल त्याच शेतकऱ्यांना समोर शासनाच्या कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळणार आहे.
शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी हे एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. या ओळखपत्रामुळे पुढे शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे. फार्मर आयडी नसेल तर शेतकऱ्याला सरकारी अनुदान, कृषी कर्ज, पीक विमा, नमो शेतकरी सन्मान निधी यांसारख्या योजनांचा लाभ घेता येणार नाही.
म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपले फार्मर आयडी काढून घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी सोमनाथ साठे यांनी केले आहे. सावनेर तालुक्यात एकूण २९४१४ शेतकरी खातेदार आहेत. यातील आतापर्यंत १६२३६ शेतकरी खातेदारांनी फार्मर आयडी काढले आहे. बऱ्यासच्या शेतकऱ्यांनी अद्यापही फार्मर आयडी काढले नाही. एकंदर तालुक्यात जवळपास ५२ टक्के शेतकऱ्यांनी फॉर्मर आयडी काढले असल्याची माहिती आहे.
काय आहे फार्मर आयडी ?शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आयडी ही एक डिजिटल ओळख आहे, जी शेतकऱ्याचे आधार कार्ड त्याच्या जमिनीच्या नोंदींशी म्हणजेच जमिनीच्या तपशिलांशी जोडते. सरकारच्या डिजिटल कृषी अभियानाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांची आणि त्यांच्या जमिनीची माहिती नोंदवली जाते.
बोगस अनुदानावर येणार टाचफार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांची ओळख पडताळण्यास मदत होणार. त्यामुळे फक्त पात्र शेतकऱ्यांनाच सरकारी लाभ मिळतील. फार्मर आयडीमुळे बोगस लाभार्थ्यांना सरकारी अनुदानापासून डावलण्यास मदत होणार.योजनांचा लाभ हवा? ‘फार्मर आयडी’ काढा; शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन; शेतीविषयक लाभासाठी अनिवार्य
...तरच मिळणार योजनांचा लाभपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, पीक विमा योजना, कृषी विभाग यांत्रिकीकरण योजना, थेट लाभ हस्तांतरण योजना, पीक कर्ज सुलभपणे मिळवण्यासाठीच्या या ओळखपत्राचा उपयोग होणार आहे. जर शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले नाही तर त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळणार नाही. याकरिता नजिकच्या सीएससी सेंटर वर जिऊ नोंदणी करून घ्या.
शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकरी खातेदारांनी फार्मर आयडी काढणे अनिवार्य आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेता येणार नाही. ज्यांनी अजूनही फार्मर आयडी काढले नाही, अशा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवानी आपले फार्मर आयडी त्वरित काढून घ्यावे.
-सोमनाथ साठे, तालुका कृषी अधिकारी, सावनेर