वर्षात खुले होणार पाच उड्डाणपूल
esakal May 25, 2025 09:45 PM

ब्रिजमोहन पाटील : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २५ : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सुमारे ५४८ कोटी रुपये खर्च करून गणेशखिंड रस्ता, कात्रज चौक, विश्रांतवाडी, सिंहगड रस्ता आणि घोरपडी या महत्त्वाच्या पाच रस्त्यांवर व चौकांमध्ये उड्डाणपुलांचे कामे सुरु आहेत. नियोजित वेळेपेक्षा ही कामे संथगतीने सुरु असल्याने भर पावसाळ्यात नागरिकांना कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. महापालिकेने भूसंपादनाचे विषय लवकर संपविले तर वर्षभराच्या आत हे सर्व पाच पूल वाहतुकीसाठी खुले होऊ शकतात. कात्रज चौक, घोरपडी येथील उड्डाणपुलांसाठी महापालिकेला गांभीर्याने काम करावे लागणार आहे.

पुणे शहरात वाढणारी वाहनांची संख्या आणि अपुऱ्या पडणाऱ्या रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीत पडत आहे. त्याला पर्याय म्हणून उड्डाणपूल, समतल विगलक बांधले जात आहेत. शहराचा विस्तार होत असताना वाहतूक व पायाभूत सुविधांचे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे असते. यासाठी शहरात एकावेळी तीन शासकीय संस्थांकडून उड्डाणपुलांची कामे सुरु आहेत. यामध्ये पुणे महापालिका, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) या संस्थांचा समावेश आहे.


१) विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपूल :
जूनमध्ये एक मार्गिका सुरु होणार :
‘पीएमआरडीए’तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील (आचार्य आनंदऋषीजी चौक) दुमजली उड्डाणपुलाचे काम जवळपास ८५ टक्के झाले आहे. पाषाण आणि बाणेरकडे रॅम्पचे काम सुरू झाले असून औंधकडून शिवाजीनगरकडे येणाऱ्या पुलाचा एक भाग जून अखेर वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. डिसेंबरपर्यंत संपूर्ण पूल वाहतुकीसाठी खुला होईल. त्यामुळे गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी नागरिकांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो प्रकल्प आणि गणेशखिंड व सेनापती बापट रस्त्यावरून पाषाण, बाणेर आणि औंधकडे सुरळीत वाहतुकीसाठी विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपूल बांधला जात आहे. ई-स्केवर आणि बाणेर येथे ज्या ठिकाणी पूल उतरणार आहे, तेथील खांबांचे काम पूर्ण झाले आहे. विद्यापीठ चौकातील खांबांचे, ५५ मीटर लांबीचे आणि १८ ते २० मीटर रुंदीचे लोखंडी गर्डरचे स्पॅन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. बाणेर आणि पाषाणकडील रॅम्पचे काम सुरू झाले असून त्यास तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

अशी आहे स्थिती....
- १४ जुलै २०२० ला उड्डाणपूल पाडला
- मेट्रो प्रकल्प आणि उड्डाणपुलाच्या कामासाठी टाटा कंपनीसोबत नोव्हेंबर २०२१ मध्ये करार
- परवानगी मिळण्यास उशीर झाल्याने ऑक्टोंबर २०२३ मध्ये दुमजली पुलाचे काम सुरू
- आतापर्यंत ८५ टक्के काम पूर्ण
- उड्डाणपुलाचा अंदाजित खर्च २५० कोटी रुपये


२) आंबेडकर चौकातील उड्डाणपूल :
१० महिन्यांत ६० टक्के कामाचे आव्हान :
पुणे महापालिकेतर्फे विश्रांतवाडीतील मुकुंदराव आंबेडकर चौकात ५१ कोटी रुपये खर्च करून उड्डाणपूल आणि समतल विगलक बांधले जात आहेत. याचे काम ४० टक्के झाले आहे. यामध्ये टिंगरेनगरकडून आळंदीकडे जाण्यासाठी ६३५ मिटर लांबीचा उड्डाणपूल बांधला जात आहे. तर आळंदीकडून पुणे आणि टिंगरेनगरकडे जाण्यासाठी वाय आकाराचा समतल विगलक बांधण्याचे काम सुरु आहे. पुण्याच्या बाजूने खोदकाम करणे, भिंत बांधण्याचे काम सुरु आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी पावसाळ्यासह दोन वर्षांची मुदत असून, मार्च २०२६ पर्यंत म्हणजे आणखी १० महिन्यांनी हा पूल खुला होईल, असा दावा महापालिकेने केला आहे.
मुकुंदराव आंबेडकर चौकातील अतिक्रमणे, नो पार्किंगमध्ये थांबणाऱ्या वाहनांमुळे कोंडीत भर पडत आहे. तसेच पादचाऱ्यांना हा


चौक ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक वाहनचालक पोलिसांच्या समोरच सिग्नल तोडून पळून जातात, अशांवर कारवाई होत नाही. पुढील महिन्यात संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा याच चौकातून पुण्यातच येणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्या लागणार आहेत.


अशा आहे स्थिती...
- एकाच चौकात उड्डाणपूल आणि समतल विगलक
- आळंदीकडून पुण्याकडे किंवा टिंगरेनगरकडे जाणारी वाहतूक समतल विगलकाचा वापर करणार
- या प्रकल्पाचा खर्च ५१ कोटी ७७ लाख रुपये
- हे काम मार्च २०२६ मध्ये पूर्ण करण्याचे बंधन
- संपूर्ण प्रकल्पाचे ४० टक्के काम पूर्ण


३) सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल :
१५ जूनची अंतिम तारीख पाळणार का? :
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने ११८ कोटी रुपये खर्च करून तीन उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरु केले. त्यातील दोन उड्डाणपुलांचे काम पूर्ण होऊन त्यांचे लोकार्पण झाले आहे. आता उड्डाणपुलाच्या तिसरा टप्पा पूर्णत्वास जात आहे. सुमारे ४० कोटी रुपये खर्च करून माणिकबाग ते हिंगणेदरम्यान हा उड्डाणपूल बांधला असून, दोन्ही बाजूच्या रॅम्पचे काम सुरु आहे. हा पूल १५ जूनपर्यंत खुला होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण रॅम्पचे काम संथगतीने सुरु आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल जुलै महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. हिंगणे येथे रॅम्प उतरताना रस्ता अरुंद झाल्याने दररोज वाहतूक कोंडी होते. त्यात रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

अशी आहे स्थिती....
- माणिकबाग ते हिंगणे उड्डाणपुलासाठी ४० कोटी रुपये खर्च
- उड्डाणपुलाची लांबी १५४० मिटर
- धायरी, नऱ्हे, खडकवासलातून येणाऱ्या वाहनचालकांना फायदा
- हिंगणे, आनंदनगर, सनसिटी, माणिकबागेतील नागरिकांची कोंडीतून होणार सुटका
- जमिनीवरील रस्त्यापेक्षा उड्डाणपुलावर जास्त कोंडी
- तिसरा उड्डाणपूल सुरु झाल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळणार

४) कात्रज चौकातील उड्डाणपूल :
पुन्हा एकदा मुदतवाढीची नामुष्की :
कात्रज चौकात ‘एनएचएआय’तर्फे बांधल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन सप्टेंबर २०२१ मध्ये झाले. हा पूल वेळेत पूर्ण न होऊ शकल्याने आतापर्यंत कामासाठी दोनवेळा मुदतवाढ दिली. आता डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत असली तरी भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्यास उशीर होत असल्याने ही मुदतही अपुरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा मुदतवाढीची नामुष्की ‘एनएचएआय’वर येणार आहे. या उड्डाणपुलासाठी राजस सोसायटी चौकातील ११ जागा मालकांपैकी सात जणांच्या जागा ताब्यात आल्या आहेत. उर्वरित जागा ताब्यात येण्यास किमान सहा महिने तरी लागणार आहेत. त्यामुळे डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत कमी पडण्याची शक्यता आहे. या पुलासाठी १६९.१६ कोटी रुपये खर्च केले जात असून, हा पूल खुला झाल्यानंतर कात्रज चौकातील अवजड वाहतुकीचा प्रश्न निकाली निघणार आहे.

अशी आहे स्थिती...
- उड्डाणपुलासाठी खर्च १६९.१५ कोटी रुपये
- वंडरसिटी ते माऊली गार्डन असा उड्डाणपुलाचा मार्ग
- उड्डाणपुलाची एकूण लांबी १३२६ मीटर
- उड्डाणपुलाची रुंदी २५.२० मीटर (सहापदरी)
- दोन्ही बाजूस ७ मीटर सेवा रस्ते
- कार्यारंभ आदेश- फेब्रुवारी २०२२, काम संपण्याची मुदत डिसेंबर २०२५


५) घोरपडी गावातील उड्डाणपूल :
एकेरी वाहतूक अन् बससेवा ठप्प :
महापालिकेतर्फे घोरपडी गावातील मिरज रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम गेल्या वर्षी सप्टेंबर २०२४ मध्ये सुरु झाले. पण दोन महिन्यापूर्वी रेल्वेजवळील एका खांबाचे खोदकाम सुरू असताना त्यामध्ये एक लहान मुल पडून त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर उड्डाणपुलाच्या कामाची गती संथ झाल्याने वाहतूक कोंडीची प्रश्न तीव्र झाला आहे. दोन महिन्यांनंतर आता पुन्हा कामाला सुरुवात झाली आहे. उड्डाणपुलासाठी झाडांचा अडथळा दूर करणे, रेल्वेच्या जागेतील व्यावसायिकांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्याचा निकाल प्रलंबित आहे. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामावर व वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे गावात एकेरी वाहतूक सुरू असून, नागरिकांना दूर अंतरावरील पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. गावातील पीएमपी बस सेवाही ठप्प झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे.

अशी आहे स्थिती...
- घोरपडी बाजार येथील आर्मी पब्लिक स्कूल ते शहीद भगतसिंग शाळेपर्यंत ६३० मिटर लांबीचा उड्डाणपूल
- एकूण खर्च ३७ कोटी रुपये
- कामाचा कालावधी दोन वर्षे
- उड्डाणपुलाची रुंदी १२ मीटर
- दोन्ही बाजूने ५ मीटरचे सेवा रस्ते
- दोन्ही बाजूला जिना

----------------------------------------
हिंगणेत संभाव्य बॉटलनेकचे नियोजन आवश्यक
सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटरपर्यंत बांधलेला उड्डाणपूल एक मे रोजी खुला केला. त्यानंतर वडगाव येथील पासलकर चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होत असून, उड्डाणपुलावरही कोंडी होत आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल बांधताना चुकला असल्याची टीका नागरिक करत आहेत. महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनी भविष्यातील समस्येचा वेध न घेतल्याने आता हा प्रश्न सोडवावा लागत आहे.
सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग ते हिंगणे दरम्यानचा उड्डाणपूल जून महिन्यात सुरु होईल, असा दावा केला जात आहे. हिंगण्यात ज्या ठिकाणी हा पूल उतरतो, तेथील खालच्या बाजूने येणारा रस्ता अरुंद असून तेथे अतिक्रमणे झाली आहेत. तसेच लगेच डाव्या बाजूला पेट्रोलपंप असून गॅस भरण्यासाठी वाहनांच्या रांग पूर्ण रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असताना उड्डाणपूल सुरु झाल्यानंतर त्यात आणखी भर पडणार आहे. अतिक्रमण काढणे, उड्डाणपुलावरून येणारी वाहने पेट्रोलपंपाकडे वळू नये, उड्डाणपुलाखालच्या रस्त्यावरील खड्डे बुजवून घेणे ही कामे तत्काळ करावी लागणार आहेत. अन्यथा सकाळी कार्यालयात वा इतर कामांसाठी बाहेर पडणाऱ्यांना हिंगण्यातील वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागण्याची शक्यता आहे.


तुमचे मत मांडा....
शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पाच महत्त्वाच्या रस्त्यांवर व चौकांमध्ये उड्डाणपुलांची कामे सुरु आहेत. मात्र, त्यांची कामे संथगतीने सुरु आहेत. त्यामुळे पुणेकरांना पावसाळ्यात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. याबाबत तुमचे मत मांडा...

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.