ठेकेदाराच्या नफ्यापेक्षा पुणेकरांचा विचार करा - सकाळच्या वाचकांनी प्रशासनाला ठणकावले
esakal May 25, 2025 09:45 PM

पुणे, ता. २५ : नाले सफाई करताना ठेकेदारांच्या चुकांकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्यामुळे पुणेकरांचा जीव धोक्यात येत आहे. पावसाळ्यात नाल्याला पूर येऊन अनेकांचे संसार वाहून जातात, आर्थिक नुकसान होते. त्यामुळे प्रशासनाने ठेकेदाराच्या नफ्यापेक्षा नागरिकांच्या फायद्याचा विचार करून त्यांच्याकडून कामे करून घ्यावीत, अशा शब्दांत ‘सकाळ’च्या वाचकांनी प्रशासनाला ठणकावले.

पुणे शहरातील नाले सफाईच्या कामाची पोलखोल ‘सकाळ’मधून करण्यात आली. त्यावर वाचकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दत्तवाडीतील रहिवासी अविनाश खंडारे म्हणाले, ‘‘पुण्यातून वाहणारा अंबिल ओढा असेल किंवा नागझरी ओढ्याच्या पुरामुळे दरवर्षी पावसाळ्यात अनेकांचे संसार वाहून जातात. प्रशासनाने ठेकेदाराऐवजी नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करून घेतले पाहिजे. ठेकेदाराच्या नफ्याऐवजी नागरिकांचा फायदा बघा, त्यांचा जीव धोक्यात जाणार नाही हे बघा. महापालिका प्रशासनाने पावसाळा तोंडावर असताना ही कामे लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे.’’

सिंहगड रस्त्यावरील नवश्या मारुती समोरील गल्लीत श्रवण बिल्डिंग पाठीमागे असलेल्या नाल्यात झाडांचा कचरा झाला आहे. गेल्यावर्षी पावसात पडलेल्या झाडांची खोडे तिथे टाकले आहेत. यामुळे ओढा तुंबण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे महापालिकेने ठेकेदाराला सांगून याठिकाणी स्वच्छता करून घ्यावी.’’
- एक नागरिक


नालेसफाई करताना नाल्याच्या बाजूला जो गाळ काढला जातो, तो उचलणे गरजेचे असते. सध्याचे पावसाळी वातावरण पाहता पाऊस कधी येतो आणि त्यातच नाल्याच्या बाजूला काढून ठेवलेला गाळ न उचलल्यामुळे पुन्हा नाल्यात वाहून जातो. त्यामुळे नागरिकांचा जीव अधिकच धोक्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाचे ठेकेदारांवर कोणतेही नियंत्रण नाही, असे निदर्शनास येत आहे.
- परेश खांडके

नाल्यातून काढलेल्या गाळाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ठेकेदारांची आहे. जर महापालिकेचे अधिकारी या प्रकरणाकडे काणाडोळा करत असतील तर त्यांना बडतर्फ केले पाहिजे.
- भूषण गोरे

कोथरूड- कर्वे नगर रस्त्यावरील हर्षल हॉलच्या प्रवेशद्वारावरील चेंबर तुटल्याने ते खचले आहे. या हॉलमध्ये कायमच समारंभ असतात. तसेच रात्रीच्यावेळी अंधारात पादचारी सुद्धा यात पडून अपघाताची शक्यता वाढली आहे. महापालिकेने तातडीने चेंबर दुरुस्त करावे.
- शिवाजी पठारे, कोथरूड

दत्त कॉलनी गल्ली क्रमांक ९ मध्ये चार-पाच वर्षे झाली रोज चेंबरमधून मैलापाणी वाहत आहे. खूप वेळा तक्रार करून सुद्धा काम होत नाही. महापालिका कधी तरी कामे करेल, ही अपेक्षा आहे.
- निखिल काळभोर, कर्वेनगर

पावसाळी वाहिनी, नाले सफाई म्हणजे पैसा कमावण्याची संधी. फक्त चेंबरच्या तोंडाजवळ असलेला कचरा, गाळ काढला म्हणजे झाली सफाई. पाइपच्या आतील गाळ कधीच काढला जात नाही. त्यामुळे पाणी वाहून जात नाही तर रस्त्यावर वाहते. गाळ काढला जात नाही, हे सर्व अधिकाऱ्यांना माहिती आहे; पण कारवाई होत नाही. पावसाळ्यामध्ये पाण्याने रस्ते, गटारे, नाले तुंबू नयेत असे पुणेकरांना वाटते. परंतु तसे होताना दिसत नाही. पाऊस आला की संपूर्ण पुण्यातील गल्लीबोळातील रस्ते, गटारे, नाले जलमय होतात.
- संभाजी साळुंखे, वारजे

महापालिकेचा कारभार हे ठेकेदार व बांधकाम व्यावसायिकांच्या मर्जीनुसार चाललेला आहे. सर्वसामान्यांची कुणीही काळजी घेणार नाही. आम्ही फक्त कर भरायचा का?
- विलास

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.