खारघर, ता. २५ (बातमीदार) : खारघर शहर दारूमुक्त व्हावे, ही सर्व खारघरवासीयांची मागणी आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार व समाजकल्याण मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन, तसेच बैठकीसाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार विक्रांत पाटील दिले. यासंदर्भात शनिवारी (ता. २४) खारघरमध्ये बैठक पार पडली. या वेळी संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य सरकारने खारघर शहर दारूमुक्त घोषित करावे, यासाठी संघर्ष समिती गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. १८ मे रोजी खारघरमधील शिल्प चौकात एकदिवसीय सांकेतिक उपोषण आयोजित करण्यात आले होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट दिली होती. दरम्यान, शनिवारी खारघर सेक्टर १९ मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार विक्रांत पाटील, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, तसेच संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आमदारांनी राज्य उत्पादन शुल्क आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्यासह इतर मंत्र्यांना निवेदन, तसेच भेट घेऊन खारघर दारूमुक्तीसाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.