पुणे- तिरुअनंतपुरम : यंदा नैॡत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) प्रवास अधिक वेगाने होत आहे. सुसाट सुटलेली ‘मॉन्सून एक्स्प्रेस’ देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार असलेल्या केरळसह, संपूर्ण कर्नाटक किनारपट्टी व्यापून गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली. तमिळनाडूचा बहुतांश भाग व्यापलेल्या मॉन्सूनने ईशान्य भारतातील मिझोरामध्ये प्रवेश केला आहे.
अंदमानात वेळेआधी दाखल झालेल्या मॉन्सूनने आठवडाभर आधीच केरळमध्ये धडक दिल्याचे हवामान विभागाने आज जाहीर केले. अरबी समुद्रातील तीव्र कमी दाब क्षेत्र पोषक ठरल्याने मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण केरळ, तमिळनाडूचा बहुतांश भाग, कर्नाटकची किनारपट्टी व्यापली आहे. तर ईशान्य भारतात जोरदार मुसंडी मारत मिझोराममध्ये मॉन्सूनपर्यंत पोहोचला आहे. यंदा केरळमध्ये आठ दिवस, तर ईशान्येकडील राज्यांत १२ दिवस अगोदर मॉन्सून दाखल झाला आहे.
दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मॉन्सून साधारणत: १ जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचतो. यंदा मॉन्सून २७ मेपर्यंत केरळमध्ये येण्याचा अंदाज होता. यात सुधारणा करताना मॉन्सून २५ मेपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. गत वर्षी देखील केरळमध्ये दोन दिवस आधीच म्हणजेच ३० मे रोजी मॉन्सूनने धडक दिली होती. तर ६ जून रोजी महाराष्ट्रातील तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मोसमी वाऱ्यांनी हजेरी लावली होती. कारवार, धर्मापुरी, चेन्नईपर्यंतच्या भागात मॉन्सून दाखल झाला आहे. ईशान्येकडील राज्यातील मिझोरामच्या सैहा शहरापर्यंत मॉन्सूनने प्रगती केली आहे. दोन दिवसांत संपूर्ण तमिळनाडू व्यापून, कर्नाटकचा आणखी काही भाग, संपूर्ण गोव्यासह, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. ईशान्येकडील राज्यासह, सिक्कीम, पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागात मॉन्सून प्रगती करण्याची शक्यता आहे.
यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केला. राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यताही आहे. लवकरच मॉन्सून हंगामाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज व विभागनिहाय पावसाचे वितरण जाहीर करण्यात येईल.
२००९ पेक्षाही वेगाने प्रगतीमॉन्सूनच्या आगमनाचा इतिहास पाहता २००९ मध्ये २३ मे रोजी मोसमी वारे केरळमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर यंदा पुन्हा मॉन्सूनने वेगाने प्रगती करत २४ मे रोजी भारताच्या मुख्य भूमीवर धडक दिली आहे. यंदा मॉन्सूनचा प्रवास २००९ पेक्षा वेगाने होत असून, केरळ, कर्नाटक किनारपट्टी व्यापून गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत मॉन्सून पोहोचला आहे. दोन दिवसांत मॉन्सून महाराष्ट्रातही दाखल होण्याची चिन्हे आहेत. २००९ मध्ये ७ जून रोजी मॉन्सून तळ कोकणात दाखल झाला होता, तसेच महाराष्ट्रातील पुढील वाटचाल १५ दिवस खोळंबली होती.
मॉन्सूनचे केरळातील आगमन
वर्ष अंदाज प्रत्यक्ष आगमन
२०२१ ३१ मे ३ जून
२०२२ २७ मे २९ मे
२०२३ ४ जून ८ जून
२०२४ ३१ मे ३० मे
२०२५ २७ मे २४ मे