पुणे : ‘‘विदेशात जाणाऱ्यांची संख्या कमी करणे गरजेचे आहे. आपल्या देशात देखील अनेक संधी उपलब्ध आहेत. पुन्हा एकदा सारे जग भारतीय ज्ञान परंपरेकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे सर्वसमावेशक शिक्षण पद्धती निर्माण करण्याचा प्रयत्न नवीन शैक्षणिक धोरणाच्या (एनर्इपी) माध्यमातून आपण करत आहेत,’’ असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
आम्ही सारे ब्राह्मण या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘ब्राह्मण भूषण’ पुरस्कार पंचांगकर्ते मोहन दाते यांना रविवारी (ता. २५) पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर उपस्थित होते. वास्तुविशारद हृषिकेश कुलकर्णी, संस्थेचे संचालक भालचंद्र कुलकर्णी, संजय ओर्पे व माधुरी कुलकर्णी यावेळी उपस्थित होत्या.
गेल्या २२५ वर्षातील विविध क्षेत्रातील राष्ट्रकार्यासाठी समर्पित कर्तृत्ववान महाराष्ट्रीय ब्राह्मणांच्या ‘ब्राह्मण रत्ने' या चरित्रकोश ग्रंथाच्या नव्या आवृत्तीचे दोन खंडात प्रकाशन करण्यात आले. वंदना धर्माधिकारी लिखित यशोगाथा-ब्राह्मण स्त्रियांच्या या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले.
पाटील म्हणाले, ‘‘ इंग्रजांनी निर्माण केलेल्या गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी काय करता येर्इल याचा विचार एनएपीमध्ये करण्यात आला आहे. देशात अशी कोणती व्यक्ती नसेल जी मुहूर्त मानत नाही. हा मुहूर्त काढण्याचे काम काम पारंपरिक पद्धतीने एका समाजाकडे आले आहे. त्या कामाला कोणी नावे ठेवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करत आपण काम योग्य प्रकारे पार पाडणे गरजेचे आहे. ’’
कुलकर्णी आणि ओर्पे यांनी संस्थेच्या कामाची माहिती दिली.
शाळेत न गेलेले विद्यार्थी देशासाठी काय हातभार लावणार?
‘‘ब्राम्हण समाजाने अनेक चांगली कामे केली आहेत. त्याचा लाभ पुढील अनेक पिढ्यांना मिळत आहे. ज्योतिष थोतांड आहे, असे जर कोणी म्हणत असेल तर त्यांनी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केलेला नाही. विज्ञानाची वाढ होत असताना आपण ज्ञान हरवून बसलो आहोत की काय, अशी चिंता आता वाटते आहे. शिक्षणाचे टप्पे सध्या त्याच पद्धतीने राहिले नाहीत. आपल्याकडे सर्व आहे व होते. पण ते शिकवले जात नाही कारण त्यांची माहितीच आपल्याला नाही. शाळेत न गेलेले विद्यार्थी देशाला काय हातभार लावणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.’’, असे अभ्यंकर म्हणाले.
यांना गौरविलेब्राह्मण भूषण पुरस्काराबरोबरच यंदाचा ‘इंदुमती-वसंत करिअर भूषण’ पुरस्कार युवा उद्योजक निर्मल देशपांडे यांना, ‘डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तनकार’ पुरस्कार युवा कीर्तनकार पुरस्कार ह.भ.प. किरण कुलकर्णी यांना तर ब्राह्मण समाजासाठी गेली ९८ वर्षे काम करणाऱ्या श्री शुक्ल यजु:शाखीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण सभा या संस्थेला ‘भगवान परशुराम ब्राह्मण संस्था’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे यंदाचे १२ वे वर्ष असून मानपत्र, पुणेरी पगडी, रोख रक्कम आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.