पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते लालूप्रसाद यादव यांनी रविवारी मुलगा तेजप्रताप यादव याची सहा वर्षांसाठी पक्ष आणि कुटुंबातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. तेजप्रतापसोबतचे सर्व कौटुंबिक संबंध देखील तोडून टाकण्यात आले आहेत. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्यांनी ही घोषणा केली. ‘‘ तेजप्रतापने त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये नैतिक मूल्यांकडे डोळेझाक केल्याने आमच्या कुटुंबाच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याला कोठेतरी तडा गेल्याचे दिसून येते. तेजप्रतापचे काम, सामाजिक वर्तणूक बेजबाबदारपणाची असून तो आमची कौटुंबिक परंपरा आणि मूल्ये यांच्या चौकटीमध्ये बसत नाही.
त्यामुळे मी त्याला माझा पक्ष आणि कुटुंबातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. येथून पुढे त्याच्याशी पक्ष आणि कुटुंबाचा कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही. त्याची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे,’’ असेही यादव यांनी ‘एक्स’वर नोंदविलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी तेजप्रतापचे एका युवतीसोबतचे छायाचित्र समाजमाध्यमांत व्हायरल झाले होते.
त्यावरूनही बरीच खळबळ माजली होती. तेजप्रताप याने मात्र आपले ते अकाउंट हॅक झाल्याचा दावा केला होता. याच छायाचित्रावरून तेजप्रतापला समाजमाध्यमांत जबरदस्त ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. ‘‘ समाजमाध्यमावरील माझे अकाउंट हॅक करण्यात आले असून संबंधित छायाचित्र देखील चुकीच्या पद्धतीने एडिट करण्यात आले आहे,’’ असे त्याने ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर नोंदविलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.