रस्ते कामाचे नियोजन खड्ड्यात
कांदिवली विभागात पालिकेचा भोंगळ कारभार
कांदिवली, ता. २७ (बातमीदार) : कांदिवली विभागात पालिकेचा भोंगळ कारभार ऐन पावसाळ्यातच उघडा पडला आहे. मुख्य मार्ग, चौक, नाके येथील रखडलेल्या रस्ते कामांमुळे खड्डे आणि खडीच्या मिश्रणाचा खच पडला आहे. काही ठिकाणी अर्धवट ठेवलेल्या कामामुळे चिखलगाळ, रोडारोडा यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना तारेवरची कसरत करीत मार्गक्रमण करावे लागत आहे.
रस्ते कामाच्या नियोजनाचे तीनतेरा वाजले असून, करोडो रुपये खर्च करूनदेखील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे स्थानिकांसह वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले आहेत.
रस्त्याची कामे सुरू झाल्यापासून धुळीचा त्रास, कर्कश आवाज आणि वाहतूक कोंडीचा प्रचंड मानसिक त्रास वाहनचालक आणि प्रवाशांना सहन करावा लागला. काँक्रीटीकरणाच्या मार्गात खड्डे, मध्येच डांबरीकरण, उंच सखलपणामुळे पाऊस उघडल्यानंतरदेखील साचणाऱ्या पाण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
पालिका अधिकाऱ्यांचा नियोजनशून्य कारभार, ठेकेदाराची मनमानी यामुळे मार्ग, चौक, नाके आदींची झालेली दयनीय अवस्था म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचे करोडो रुपये खड्ड्यात गेल्याचे जिवंत उदाहरण असल्याचे ठाकरे गटाचे उपविभागप्रमुख आशीष पाटील यांनी सांगितले.
----------------------------
कामाची गुणवत्ता खड्ड्यात
रस्त्याची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन ढासळल्याने २० मेपर्यंत रस्ते वापरण्याजोगे करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाने दिल्या होत्या, मात्र पावसाचे आगमन झाल्याने बहुतांशी कामे भरपावसात पूर्ण करण्याचा केविलवाणा प्रयत्न ठेकेदारांकडून केला. यामुळे रस्त्याच्या कामाची गुणवत्ता लयास गेली आहे.
---------------------------------
खड्ड्यांच्या विळख्यात चौक
स्वामी विवेकानंद मार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक असते. या मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. डांबरी खडीचे मिश्रण उघडे पडल्याने रस्त्यावर खडी पसरून खड्डे निर्माण झाल्याने पाणी साचत आहे. मथुरादास छेद मार्गाच्या कोपऱ्यावर, श्याम सत्संग मार्गावर, आत्मीय मार्ग, आकुर्ली मुख्य मार्गासह इतर मार्गांवर तसेच बहुतांशी चौक, नाके, सिग्नल भागात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
------------------------------
फोटो
स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी मार्गासह इतर मार्ग..