अक्षय बडवे, साम टीव्ही
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या 'चंगळ्या' म्हणजेच शुभम माळवे याला पुण्यातील एका वकिलाने बदनामी आणि फसवेगिरी केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस बजावली आहे. शुभम आणि त्याच्या आईने प्रतीक्षा शिंदे या महिला आणि त्यांच्या पतीच्या विरोधात अपमानजनक आणि खोटा व्हिडिओ बनवला. त्यानंतर तो सोशल मीडियावर पोस्ट करून प्रसिद्धी मिळवल्याचा आरोप वकील वाजीद खान बिडकर यांनी केला आहे.
वाजीद खान बिडकर हे प्रतीक्षा शिंदे नामक महिलेचे वकील आहेत. शिंदे आणि माळवे यांची यापूर्वीची ओळख असून 'चंगळ्या'ने जाणूनबुजून शिंदे आणि त्यांचे पती यांच्याबद्दल अपमानजनक व्हिडिओ बनवून त्यांना मानसिक त्रास होईल, असा मजकूर तयार करून सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी अपलोड केला असा आरोप शिंदेंच्या वतीने करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणी आता 'चंगळ्या' आणि त्याची आई निर्मला माळवे यांनी ७ दिवसात उत्तर द्यावं, असं या नोटीस मध्ये म्हणलं गेलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?'चंगळ्या बोले... कुहू' अशा आशयाचा अनेक रिल्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत. यातील 'चंगळ्या' म्हणजेच शुभम माळवे हा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील डिकसळ या गावातील राहणारा आहे. आता चंगळ्या आणि त्याच्या आईच्या विरोधात पुण्यातील वाजीद खान बिडकर या वकिलाने नोटीस पाठवली आहे. वाजीद खान यांनी त्यांचे पक्षकार प्रतीक्षा विजय शिंदे यांच्या वतीने ही नोटीस त्याला पाठवण्यात आली आहे.
नोटीसमधील म्हणण्यानुसार, चंगळ्याने काही दिवसांपूर्वी एक रिल पोस्ट केली होता. या व्हिडिओ मध्ये चंगळ्या आणि त्याच्या आईने प्रतीक्षा विजय शिंदे यांच्या विरोधात बदनामी आणि अपमानकारक मजकूर असलेला व्हिडिओ प्रसिद्ध केला असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.
एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. यामध्ये चंगळ्या आणि त्याच्या आईने प्रतीक्षा शिंदे यांचे नाव घेतलं होतं. या व्हिडिओमध्ये चंगळ्याची आई म्हणाली, 'चंगळ्या २००८ हे आय डी माझ्या भावाचा मुलगा चालवत होता. माझ्यावर विश्वास ठेव आणि पाठव म्हणून तो म्हणायचा. चंगळ्याला पुण्याला नेलं. २ ते ३ दिवस तो चांगला राहिला, पण त्याची पत्नी प्रतीक्षा शिंदेने त्याला मारहाण केली. त्यांनी माझ्या मुलाची बॅग सुद्धा दिली नाही'.
या व्हिडिओमध्ये प्रतीक्षा शिंदे आणि त्यांचे पती विजय यांचे नाव घेतल्यामुळे आता शिंदे यांनी बदनामी झाल्याचा आरोप करत चंगळ्या आणि त्याच्या आईला नोटीस पाठवली आहे. आणखी एका व्हिडीओमध्ये, निर्मला माळवे यांनी 'चंगळ्या २००८ हे आय डी बंद झालेलं आहे. या आयडीवरुन आमची झाली. त्यामुळे त्या आयडीला कोणी फॉलो करू नका. चंगळ्या ११ हे आयडी आहे, जसं प्रेम आधी दिलं, तसं आता प्रेम द्या', असं म्हणाल्या आहेत.