Aditi Tatkare: बीड पोलिस खात्यातून बडतर्फ झालेले पीएसआय रणजित कासले यांना जामीन मिळाल्यानंतर ते वेगवळ्या ठिकाणांवर फिरुन गौप्यस्फोट करीत आहेत. जेलमध्ये वाल्मिक कराडला मिळत असलेली व्हिआयपी ट्रीटमेंट आणि अजित पवारांचे पुत्र जय पवार यांच्याबाबतचे आरोप करुन कासलेंनी खळबळ उडवून दिली. त्यानंतर आता ते थेट सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्यावर बोलले आहेत.
रणजित कासले एका व्हिडीओमध्ये म्हणतात, पहिल्या किंवा दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये मी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात होतो. तेव्हा मी युनिफॉर्मवर ड्युटी करीत होतो. तेव्हा ड्रग्जच्या बाबतीत मला एक अनुभव आला होता. त्यामध्ये एवढ्या मोठ्या व्यक्तीचं नाव आहे, त्याचा कुणी विचारही करु शकणार नाही. यामध्ये काही बॉलिवूड कलाकार, पोलिस आणि राजकीय लोक अडकू शकतात.
सहा तास पाठलाग करुन कार पकडलीकासले पुढे म्हणतात, लॉकडाऊनध्ये मी एक गाडी अडवली होती. गाडीची तपासणी करत असताना गाडी चालक पळून गेला. मी सहा तास पाठलाग करुन पुन्हा ती गाडी पकडून आणली होती. ती एक लॅम्बोर्गिनी कार होती. त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज होतं. परंतु हे प्रकरण दाबण्यात आलं.
कासले पुढे दावा करतात, त्या गाडीमध्ये एक कार्ड सापडलं होतं. ते एका आमदाराचं कार्ड होतं. आज ते मंत्री आहेत.. ते किंवी ती असू शकतात. अजित पवारांच्या पक्षाचा तो किंवा ती मंत्री आहे. त्या कार्डवर प्रधान सचिवांची सही होती, शिवाय महाराष्ट्र विधानसभेचा शिक्काही होता.
हा व्हिडीओ इथेच संपतो. पुढच्या व्हिडीओमध्ये कासले सांगतात की, मी जो फोटो दाखवला नव्हता, तो फोटो आदिती तटकरे यांचा आहे. त्या कार्डवर आदिती यांचा फोटो असल्याचा दावा कासलेंचा आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्यांनी आयकार्डवरचा फोटो दाखवला नसला तरी थेटपणे मंत्री आदिती तटकरे यांचं नाव घेतलं आहे.
माझा मर्डर होऊ शकतो, मी आता घाबरलो आहे.. असं रणजित कासले म्हणत आहेत. त्या गाडीमध्ये ललित पाटील, भूषण पाटील, बलकवडे वगैरे असू शकतात.. तेव्हा त्यांना एवढं कोणी ओळखत नव्हतं, असं कासले म्हणाले. याशिवाय आपल्याकडे आणखी एका नेत्याच्या मुलाचा मर्डरमध्ये सहभाग असल्याची माहिती आहे, असं म्हणत त्यांनी नव्या व्हिडीओचे संकेत दिले.