इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील ७० सामने मंगळवारी (२७ मे) संपले. अखेरचा साखळी सामना मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात पार पडला. या अखेरच्या साखळी सामन्यानंतर पाँइंट्स टेबलमधील चित्र स्पष्ट झाले.
त्याबरोबरच प्लेऑफमधील क्वालिफायर १ आणि एलिमिनेटर सामन्यात कोण कोणाविरुद्ध खेळणार हे देखील स्पष्ट झाले आहे.
अखेरच्या साखळी सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने बंगळुरूसमोर २२८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग बंगळुरूने १८.४ षटकात ४ विकेट्स गमावत २३० धावा करत पूर्ण केला. हे बंगळुरूने पार केलेलं सर्वोच्च धावांचे लक्ष्य ठरले.
लखनौच्या या विजयामुळे बंगळुरूने पाँइंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान पक्के केले आणि गुजरात टायटन्स तिसऱ्या क्रमांकावर घसरले. याआधी सोमवारी पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करत अव्वल क्रमांक मिळवला होता, तर मुंबई चोथ्या क्रमांकावर राहिले.
दरम्यान, गेल्याच आठवड्यात पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या चार संघांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. पण पहिल्या दोन क्रमांकावर राहण्यासाठी शेवटच्या साखळी सामन्यापर्यंत चुरस होती. अखेर शेवटच्या दोन साखळी सामन्यानंतर चित्र स्पष्ट झाले.
आता पहिल्या दोन क्रमांकावर असलेल्या पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात क्वालिफायर १ सामना २९ मे रोजी होणार आहे. तसेच तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स संघात ३० मे रोजी एलिमिनेटर सामना होणार आहे. हे दोन्ही सामने मुल्लनपूरला होणार आहेत.
पंजाब किंग्स १४ सामन्यात ९ विजय, ४ पराभव आणि १ रद्द सामन्यासह १९ गुण मिळवून पहिल्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १४ सामन्यांत ९ विजय, ४ पराभव आणि १ रद्द सामन्यासह १९ गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबचा नेट रन रेट बंगळुरूपेक्षा जास्त असल्याने ते अव्वल क्रमांकावर आहेत.
गुजरात टायटन्सने १४ सामन्यांत ९ विजय आणि ५ पराभवांसह १८ गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळवला आहे. मुंबई इंडियन्स १४ सामन्यांत ८ विजय आणि ६ पराभवांसह १६ गुण मिळवून चौथ्या क्रमांकावर आहेत.
कसे आहे प्लेऑफचे स्वरुप ?पाँइंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर राहिलेले संघ क्वालिफायर १ सामना खेळतात. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करतो. म्हणजेच आता पंजाब आणि बंगळुरू यांना क्वालिफायर १ सामना जिंकून थेट अंतिम सामना गाठण्याची संधी असेल. तसेच पराभूत होणाऱ्या संघाला क्वालिफायर २ सामना खेळण्याची दुसरी संधी मिळेल.
तसेच एलिमिनेटरमध्ये विजय मिळवणारा संघ क्वालिफायर २ सामन्यात प्रवेश करेल, तर पराभूत होणाऱ्या संघाचे आव्हान संपणार आहे. म्हणजेच गुजरात आणि मुंबई यांच्यात होणाऱ्या एलिमिनेटर सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर जाईल. तसेच विजय मिळवणारा संघ क्वालिफायर २ मध्ये पंजाब आणि बंगळुरू यांच्यात पराभूत होणाऱ्या संघाविरुद्ध खेळले. क्वालिफायर २ मध्ये विजयी होणारा संघ अंतिम सामन्यात पोहचणारा दुसरा संघ असेल.
प्लेऑफचे सामने - (वेळ - संध्या. ७.३० वा.)२९ मे : क्वालिफायर १ सामना - पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुल्लनपूर
३० मे : एलिमिनेटर सामना - गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, मुल्लनपूर
१ जून : क्वालिफायर २ सामना, अहमदाबाद
३ जून : अंतिम सामना, अहमदाबाद