लखनौ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोयंका यांच्या स्वभावाची चर्चा सोशल मीडियावर होत असते. संघाच्या सुमार कामगिरीनंतर त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव सोशल मीडियावर व्हायरल होतात. मागच्या पर्वातही केएल राहुल आणि त्यांच्यातील मैदानाती व्हिडीओ क्लिप खूपच गाजली होती. त्यामुळे यंदाच्या पर्वातही लखनौ सुपर जायंट्सच्या सुमार कामगिरीनंतर संजीव गोयंका काय बोलतात? याकडे लक्ष लागून होतं. कारण 27 कोटी रुपये खर्च करून सर्वात महागडा खेळाडू संघात घेतला होता. तसेच ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली होती. आयपीएल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर शेवटचा सामना जिंकून गोड निरोप देण्याचं स्वप्नही भंगलं आहे. लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 227 धावा केल्या आणि विजयासाठी 228 धावांचं आव्हान दिलं होतं. पण तरीही पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
या सामन्यात कर्णधार ऋषभ पंतने 11 चौकार आणि 8 षटकार मारत 193 च्या स्ट्राईक रेटने 61 चेंडूत नाबाद 118 धावांची खेळी केली. पण पराभवामुळे ही खेळी व्यर्थ गेली. लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी पंतच्या कामगिरीवर आपलं मत एका शब्दात व्यक्त केलं आहे. सामना गमावला असला तरी ऋषभ पंतला जुन्या शैलीत खेळताना पाहून आनंदी झाले. त्यांनी एक्स हँडलवर एका शब्दात या खेळीचं वर्णन केलं. ‘Pant’astic! हा एक शब्द लिहून पंतच्या खेळीचं कौतुक केलं.
संजीव गोयंका यांनी फँटास्टिकऐवजी पंतास्टीक असं लिहीलं. कारण ऋषभ पंत फॉर्मात परतल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याची खेळी पाहून पुढच्या पर्वातही लखनौ सुपर जायंट्सची सूत्र त्याच्याच हाती असतील हे निश्चित आहे. ऋषभ पंत या स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात फेल गेला होता. त्याला एक अर्धशतक झळकावण्यात यश आलं होतं. पण शेवटच्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली. त्याने 14 पैकी 13 सामन्यात फलंदाजी केली आणि एकूण 269 धावा केल्या.