मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सातत्याने भाजपसह विरोधी पक्षांवर निशाणा साधत असतात. पण, बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारने घेतलेल्या एका निर्णयाचे कौतुक केले. एरवी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात. पण, नुकतेच सरकारने ब्रिटिशांकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पदवी भारतात आणणार असल्याचे जाहीर केले. यावरून शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारचे कौतुक केले आहे. “वीर सावरकरांची जी पदवी ब्रिटिशांनी जप्त केली होती, ती सरकार पुन्हा भारतात आणण्याचा प्रयत्न करत असून हे स्वागतार्ह आहे. हा आपला ठेवा असून तो जपला पाहिजे.” असा सल्ला देत त्यांनी साकारच्या नेतृत्वाचे कौतुक केले. (Sanjay Raut Shivsena UBT on veer Savarkar and Government)
हेही वाचा : Vaishnavi Hagawane : राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधे कुटुंबातही महिलांचा छळ, नेमकं प्रकरण काय?
“जसे बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील राहते घर सरकारने ताब्यात घेतले आहे. तिथे त्यांचे मेमोरियल केले आहे. मी त्यांचे या बाबतीत स्वागत करतो. वाघ नखे भारतात आणली, तलवार आणली त्यावर वाद सध्या सुरू आहे. आता वाघ नखे कुठे आहेत? निवडणुकीआधी प्रदर्शनात फिरवली. आता त्या वाघ नखांचे काय झाले?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. “नागपूरच्या भोसल्यांची तलवार परत राज्यात आणली जाणार हे ठीक आहे. पण वीर सावरकरांची पदवी ब्रिटिशांनी जप्त केली होती. त्याबाबात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका मांडली. त्यांनी मांडलेल्या भूमिकेला विरोध नाही. पण खरी पदवी आणा. कागदाचा तुकडा ब्रिटिशांनी जप्त केला तरी आम्ही सावरकरांना बॅरिस्टरच मानतो,” असे म्हणत त्यांनी टोलादेखील लगावला आहे.
“संपूर्ण देशाची मागणी आहे की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात यावा. मंगळवारी (27 मे) पद्म पुरस्कारांचे वितरण झाले. आम्हाला वाटत होते की, यंदाच्या वर्षी तरी सावरकरांना भारतरत्न दिले जाईल. आम्ही किती वेळ वाट पाहिली आहे. तुम्ही पदव्या, टोप्या आणाल पण सावरकरांचा खरा सन्मान हा त्यांच्या विचारधारेत आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न देऊन टीकाकारांचे तोंड बंद केले पाहिजे.” असे म्हणत शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.