swt282.jpg
66727
मुंबईः राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत कुडाळ पंचायत समितीचा पुरस्कार स्वीकारताना सहाय्यक गटविकास अधिकारी शाम चव्हाण, वरिष्ठ सहाय्यक रवींद्र पोवार.
‘पंचायतराज अभियान’ अंतर्गत
कुडाळ नगरपंचायतीचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ः यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान २०२३-२४ अंतर्गत कोकण विभागात द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या कुडाळ पंचायत समितीला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत आणि ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मुंबई येथे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कुडाळचे सहाय्यक गटविकास अधिकारी शाम चव्हाण व वरिष्ठ सहाय्यक रवींद्र पोवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
हा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी (ता. २७) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालय, मुंबई येथे पार पडला. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे मंत्री जयकुमार गोरे, गृह, ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी आदींसह सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या अभियानांतर्गत राज्याकडून राज्यातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांना महसुली विभागस्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांची घोषणा अलीकडेच शासनाकडून केली होती.
कोकण विभागात शहापूर पंचायत समितीने (जि. ठाणे) प्रथम, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळने द्वितीय क्रमांक तर कणकवली पंचायत समितीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अनुक्रमे ११ लाख, ८ लाख व ६ लाख तसेच सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराच्या बक्षिसांचे स्वरुप आहे.