पुणे - महापालिका निवडणुकीत युती होणार की स्वतंत्र लढायचे याचा निर्णय आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते घेतली, त्याची कार्यकर्त्यांनी काळजी करू नये. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून, घरोघरी जाऊन तुम्हाला दिलेली जबाबदारी पार पाडा. आगामी महापालिका निवडणुकीत आपल्याला ऐतिहासिक विजय मिळवायचा आहे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केल्या.
चंद्रकांत पाटील यांनी कसबा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. आमदार हेमंत रासने, शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बिडकर, शैलेश टिळक, स्वरदा बापट, राघवेंद्र मानकर, राजेंद्र काकडे, प्रमोद कोंढरे, दीपक पोटे आदी यावेळी उपस्थित होते.
शहराध्यक्ष तसेच मंडल अध्यक्षांची निवड पूर्ण झाली आहे. मंडल अध्यक्षांनी आता सर्व आघाड्या व मोर्चाच्यांच्या अध्यक्षांची व कार्यकारिणी निवड लवकर पूर्ण करावी. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी ग्राउंडवर उतरून काम केले.
त्यामुळे आपल्याला मोठे यश मिळाले. आगामी महापालिका निवडणुकीत ही आपल्याला तसेच यश मिळवायचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, असेही पाटील यांनी सांगितले.
निवडणूक प्रमुख बिडकर
आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपतर्फे निवडणूक समिती स्थापन केली जाणार आहे. त्याच्या अध्यक्षपदी माजी सभागृहनेते गणेश बिडकर हे असणार आहे, असेही पाटील यांनी या बैठकीत सांगितले असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.