रस्ते तत्काळ खड्डेमुक्त करा;
अन्यथा ‘झाडे लावा’ आंदोलन
हरी खोबरेकरः ‘बांधकाम’ला इशारा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २८ : तालुक्यातील वायरी, तारकर्ली, देवबाग या रस्त्यांवर भूमिगत वीज वाहिन्यांसाठी खोदाई करण्यात आल्यानंतर या रस्त्याच्या बाजूला खड्डे निर्माण झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी खराब बनला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत; अन्यथा ठाकरे शिवसेनेकडून या खड्ड्यांमध्ये ‘झाडे लावा, झाडे जगवा’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
याबाबत श्री. खोबरेकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे. वायरी, तारकर्ली, देवबाग हा मुख्य मार्ग असून या मार्गावर भूमिगत वीज वाहिन्यांचे काम करताना रस्त्याची खोदाई करण्यात आली. यामुळे या रस्त्याची बाजूपट्टी खराब होऊन रस्त्याच्या बाजूला खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. अनेक वाहनचालकांचे अपघात या मार्गावर झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करून बुजवावेत व रस्ता सुस्थितीत करण्यात यावा. हे खड्डे त्वरित न बुजविल्यास त्याच खड्ड्यांमध्ये ‘झाडे लावा, झाडे जगवा’ आंदोलन छेडण्यात येईल, असे खोबरेकर यांनी म्हटले आहे.