मागील वर्षाच्या तुलनेत 14 टक्के वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने 2024-25 या आर्थिक वर्षात 81 अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) मिळवून एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला. मागील वर्षाच्या तुलनेत 14 टक्के वाढ दर्शवते. ही वाढ सेवा आणि उत्पादन क्षेत्रात मजबूत गुंतवणूक प्रवाहामुळे झाली असून ती भारताच्या उदार गुंतवणूक राजवटीच्या यशाचे आणि जागतिक व्यापार-व्यवसाय क्षेत्रातील वाढती प्रतिष्ठा दर्शवते.
भारतात थेट परकीय गुंतवणूक प्रवाह 2024-25 या आर्थिक वर्षात 81.04 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. ही वाढ सेवा क्षेत्रामुळे झाली असून एफडीआय इक्विटी प्रवाहात या क्षेत्रात 40.77 टक्क्यांची वाढ नोंद झाली आहे. या वाढत्या कमाईमुळे जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळात भारताला एक चैतन्यशील आणि आकर्षक गुंतवणूक केंद्र म्हणून सादर केले आहे.
महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानी
प्रमुख थेट परकीय गुंतवणूक प्राप्त करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राने अव्वल स्थान मिळवले आहे. महाराष्ट्राचा वाटा एकूण एफडीआय इक्विटीच्या 39 टक्के असून कर्नाटक 13 तर दिल्लीत 12 टक्के इतका आहे. तसेच सर्वोच्च थेट परकीय गुंतवणूक स्रोत देशांमध्ये सिंगापूरमधून एकूण थेट परकीय गुंतवणूकीच्या 30 टक्के रक्कम प्राप्त झाली आहे. तसेच मॉरिशस 17 टक्के आणि अमेरिका 11 टक्के असा प्राधान्यक्रम दिसून येत आहे.