पिंपरी, ता. २९ ः ‘‘मासिक पाळीविषयी अनभिज्ञता आणि गैरसमज हे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरतात. योग्य माहितीच्या अभावामुळे त्यांना संसर्ग, गर्भाशयासंबंधी विकारांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत मासिक पाळीविषयी न्यूनगंड न बाळगता निःसंकोचपणे चर्चा केली पाहिजे. याबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने विविध उपक्रम सातत्याने हाती घेण्यात येतात,’’ अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.
२८ मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष जागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरी नलावडे, डॉ. अंजली ढोणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुपेकर, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, सुधीर वाघमारे, शांताराम माने, मुख्य आरोग्य निरीक्षक श्रीराम गायकवाड, विजय वावरे, प्रशांत शर्मा, प्रवीण जाधव आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
उपायुक्त सचिन पवार म्हणाले, ‘‘सफाई कामगार महिलांनी कामाच्या ठिकाणी आरोग्य सुविधा आणि सुरक्षा साधनांचा वापर करावा. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्य विषयक समस्यांबाबत निःसंकोचपणे संवाद साधावा. महापालिका देखील सातत्याने महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम घेत असते.’’
युनिसेफचे सल्लागार संदीप तेंडुलकर यांनी मासिक पाळीबाबत समज-गैरसमज याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. समाजाने याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला हवा. कारण आरोग्यदृष्ट्या सक्षम, सशक्त स्त्री ही कुटुंबाच्या प्रगतीची गुरुकिल्ली असते.’’ सूत्रसंचालन स्वाती शिरतर व वसीम शेख यांनी केले.