Pune : किडनी रॅकेट प्रकरणी ससूनच्या डॉक्टरला अटक, बनावट कुटुंब दाखवून करायचे किडनी एक्सचेंज
esakal May 30, 2025 02:45 AM

पुण्यात बहुचर्चित किडनी रॅकेट प्रकरणी ससूनच्या माजी वैद्यकीय अधीक्षकाला ताब्यात घेण्यात आलंय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं डॉक्टर अजय तावरेला अटक केलीय. अजय तावरेला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने तावरेला २ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. किडनी रॅकेट प्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. पोर्शे कार प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी सध्या डॉक्टर तावरे हा न्यायालयीन कोठडीत होता. त्याला येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं.

काय आहे प्रकरण?

कोल्हापूरमधील एका महिलेला १५ लाख रुपयांचं आमिष दाखवण्यात आलं होतं. एका पुरुषाला किडनीची गरज होती आणि त्याची पत्नी असल्याचं त्या महिलेला सांगायचं होतं. त्याच्या आधारे एका तरुण महिला रुग्णाला तिने आपली किडनी दान केली. त्यानंतर बदल्यात त्या तरुणीच्या आईने त्या पुरुषाला किडनी दान केली. म्हणजेच, ही एक बनावट कुटुंब नात्यांवर आधारित "किडनी एक्सचेंज" व्यवस्था होती. पण हे प्रकरण पैशांवरून वाद झाल्यानंतर उघडकीस आलं होतं.

डॉ. अजय तावरे यांची भूमिका

संपूर्ण किडनी प्रत्यारोपण प्रक्रियेमध्ये डॉ. अजय तावरे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती, असं पोलिसांचं म्हणणं आहे. ते त्या वेळी रिजनल ऑथरायझेशन कमिटीचे अध्यक्ष होते. किडनी देणारे आणि घेणारे दोघंही बनावट असल्याची माहिती त्यांना होती. तरीही तावरे यांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि खोट्या कागदपत्रांना वैधता दिली, असा आरोप आहे. सहआरोपी म्हणून अटक या प्रकरणातील मुख्य आरोपींमध्ये आता डॉ. तावरे यांचा समावेश झाला आहे.

पुणे गुन्हे शाखेकडून तपास सुरू

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आता या रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणखी कोणी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी किंवा दलाल या प्रकरणात सहभागी आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. तावरेला सहआरोपी म्हणून तपासात सामील करण्यात आलं आहे. पुढील काही दिवसांत त्यांच्या भूमिकेचा सखोल तपास होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.