IPL 2025: पंजाब किंग्सचे फॅन्स नाराज होऊ नका, RCB विरुद्धच्या पराभवानंतरही PBKS पोहचू शकतात फायनलमध्ये
esakal May 30, 2025 06:45 AM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. त्यांनी गुरुवारी क्वालिफायर १ सामन्यात पंजाब किंग्सला ८ विकेट्सने पराभूत करत चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात बंगळुरूने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही विभागात पंजाबपेक्षा वरचढ कामगिरी केली.

या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेत पंजाब किंग्सला १४.१ षटकातच १०१ धावांवर सर्वबाद केले होते. त्यानंतर १० षटकात २ विकेट्स गमावत १०६ धावा करून सामना जिंकला.

तथापि, या सामन्यात जरी पराभवाचा धक्का बसला असला, तरी त्यांचे आव्हान अजून कायम आहे. पंजाब किंग्स अजूनही अंतिम सामन्यात प्रवेश करू शकतात.

खरंतर पाँइंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर राहणाऱ्या संघांना क्वालिफायर १ सामना खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे पराभूत होणाऱ्या संघाला दुसरी संधी देखील असते.

पाँइंट्स टेबलमध्ये पंजाब किंग्स पहिल्या आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे या दोन्ही संघात झालेल्या क्वालिफायर १ सामन्यातील पराभूत पंजाब किंग्सला दुसरी संधी मिळणार आहे.

नियमानुसार क्वालिफायर १ सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम सामन्यात पोहचतो, तर पराभूत संघ क्वालिफायर २ सामन्यात खेळतो. तसेच पाँइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघात एलिमिनेटर सामना खेळवला जातो.

या एलिमिनेटर सामन्यात पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर होतो, तर विजेता संघ क्वालिफायर २ सामन्यात खेळतो. क्वालिफायर २ सामन्यातील विजेता संघ अंतिम सामन्यात पोहचणारा दुसरा संघ ठरतो.

या नियमानुसार आता पंजाब किंग्स क्वालिफायर २ सामन्यात १ जून रोजी खेळेल. तसेच ३० मे रोजी होणाऱ्या गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होणाऱ्या एलिमिनेटर सामन्यातील विजेता संघ पंजाब किंग्सविरुद्ध क्वालिफायर २ सामन्यात खेळेल.

१ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायर २ सामना होणार आहे. त्यामुळे जर पंजाब किंग्सने क्वालिफायर २ सामना जिंकला, तर ते अंतिम सामन्यात पोहचू शकतात. अंतिम सामना ३ जून रोजी अहमदाबादला खेळवला जाणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.