सर्वोच्च न्यायालयात तीन न्यायाधीशांनी नियुक्त केले
Marathi May 30, 2025 02:25 PM

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयात तीन नव्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नावांची सूचना गेल्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने केली आहे. त्यांच्या नावाला गुरुवारी केंद्र सरकारने मान्यता दिली आणि त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून करण्यात आल्याची घोषणा केली. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन. व्ही. अंजारिया, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विजय बिष्णोई आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए. एस. चांदूरकर यांच्या नावांची सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने केली होती. आता त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे.

तीन रिक्त पदांवर नियुक्ती

माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्या. अभय एस. ओक आणि न्या. हृषिकेश रॉय हे सर्वोच्च न्यायालयाचे तीन न्यायाधीश नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांची पदे रिक्त होती. आता या पदांवर नव्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्या. बेला एम. त्रिवेदी यांनीही त्यांच्या निवृत्तीकाळाच्या आधी काही दिवस निवृत्ती घेतली होती. हे पद अद्याप रिक्त आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची एकंदर संख्या 34 असते. सध्या 33 न्यायाधीश कार्यरत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.