केडीएमसीत दोन बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल
केडीएमसीच्या वैद्यकीय विभागाची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० ः कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने दोन बोगस डॉक्टरांवर कारवाई केली आहे. डॉ. देवेंद्र पुजारी व डॉ. श्रीकृष्ण कुमावत अशी दोघांची नावे आहेत. हे दोघेही अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे आढळून आल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाने विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दाखल केली.
एका डॉक्टरने कुमावत, पुजारी यांच्याविरुद्ध दोन वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. केडीएमसीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर सरवणकर यांच्या प्राथमिक तपासणी अहवालानुसार, पालिकेच्या वतीने बोगस डॉक्टर शोधमोहीम राबविण्यात येत होती. फेब्रुवारी २०२४ मध्ये उल्हासनगरमधील माणेरे गावातील साई क्लिनिक येथे पथक गेले होते. त्या वेळी तेथे अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याने श्रीकृष्ण कुमावत व देवेंद्र पुजारी यांच्याविरोधात विठ्ठलवाडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
कुमावत यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही, तर पुजारी यांच्याकडे इलेक्ट्रो होमिओपॅथी अशी शैक्षणिक अर्हता आहे. तथापि इलेक्ट्रो होमिओपॅथी ही मान्यताप्राप्त चिकित्सापद्धती नसल्याने व या पद्धतीतील अर्हताधारकांचे कोणत्याही वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी होऊ शकत नसल्यामुळे असे व्यावसायिक अनधिकृत ठरतात. त्यामुळे दोन्ही व्यक्तींवर महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ मधील कलम ३३ व ३६ तसेच भारतीय न्यायसंहिता कायदा २०२३ चे कलम ३९८ व ३९९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाणे यांच्यामार्फत अधिक तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.