मोटेवाडी तलाव शंभर टक्के भरला
esakal June 01, 2025 12:45 AM

गुनाट, ता.३१ : अवकाळी पावसामुळे मोटेवाडी (ता. शिरूर) येथील मोटेवाडी तलाव हा तलाव गेल्या ५३ वर्षांत पहिल्यांदाच मे महिन्यात १०० टक्के भरला आहे. पूर्ण क्षमतेने तलाव भरल्याने येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. याच वर्षी या तलावातील साठलेला गाळ काढण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला होता. त्यामुळे या तलावाची खोली ही वाढल्याने पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.

तलावातील पाणी साठ्यातून चव्हाणवाडी, मोटेवाडी, निमोणे, दुर्गे वस्ती आदी गावांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. एक ते दीड हजार हेक्टर क्षेत्र या तलावातील पाण्यामुळे ओलीताखाली येते. त्यामुळे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरणे शेतकऱ्यांसाठी आवश्यक असते. एरवी हा तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी कधी कधी ऑगस्ट सप्टेंबर महिन्याची वाट पाहावी लागायची. यंदा मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची ही चिंता ही दूर केली.

मोटेवाडी तलाव येथील शेतकऱ्यांची जीवनवाहिनी आहे. या वर्षी अवकाळीच्या पावसाने दाखवलेल्या कृपादृष्टी मुळे हा तलाव भरला. आता शेतकऱ्यांच्या आडसाली ऊस लागवडीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने हा हंगाम सुखरूपपणे पार पडणार आहे.
- संतोष काळे, शेतकरी, निमोणे

मोटेवाडी ता शिरूर येथील पूर्ण क्षमतेने भरलेला तलाव.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.