महसूल खात्याचा गैरवापर, शिरसाटांनी 67 कोटींत खरेदी केलेल्या हॉटेल व्यवहाराला स्थगिती द्यावी; अंबादास दानवेंची मागणी
Marathi June 01, 2025 01:27 AM

मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत 200 कोटींचे आलिशान वेदांत हॉटेल 67 कोटींत खरेदी केलं. या व्यवहारात महसूल खात्याचा गैरवापर करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला असून हॉटेल खरेदीच्या या स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे. मिंधे गटाचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सरकारला कोट्यवधी रुपयांना गंडवलं आहे. शासकीय लिलाव प्रक्रियेत छत्रपती संभाजीनगर येथील सुमारे 200 कोटींचे आलिशान वेदांत हॉटेल संजय शिरसाट यांच्या दबावामुळे महसूल विभागाने त्यांचा मुलगा सिद्धांत याला अवघ्या 67 कोटी रुपयांना विकल्यामुळे सरकारचा कोट्यवधीचा महसूल बुडाला आहे. यातच माध्यमांशी संवाद साधताना दानवे यांनी ही मागणी केली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे म्हणाले की, “या हॉटेलची किंमत 2011 मध्ये 110 कोटी होती. 2011 ते 2025 मध्ये किंमत जास्त होते की, कमी होते? 2011 साली याची किंमत 110 कोटी होती, जी 2025 मध्ये 67 कोटी झाली. एखाद्या वस्तूची विक्री होत नाही, म्हणून ती कवडीमोल किंमतीत विकायची का?”

अंबादास दानवे म्हणाले, “कोर्टाच्या डायरेक्शनमध्ये ज्यांना कोणाला या लिलावात यायचं आहे, त्याच्या खात्यात किती रक्कम असायला पाहिजे, त्याचं उत्पन्न किती असलं पाहिजे, याचा उल्लेख केला आहे.” ते म्हणाले, संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे की, या व्यवहारात त्यांचे पाच पार्टनर आहेत. माझं त्यांना खुलं आव्हान आहे की, त्यांनी त्यांच्या पाच पार्टनरची नावे जाहीर करावीत. तसेच ही कंपनी कधी रजिस्टर झाली, हेही सांगावं.”

दानवे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस म्हणतात माझे सरकार फार स्वच्छ आहे, भ्रष्टाचारापासून मुक्त आहे. माझे अधिकारी फार इमानदार आहेत. काहीतरी नंबर देतात, ते एक नंबर, दोन नंबर, पाच नंबर, हे सगळं धूळफेक आहे. फडणवीस यांनी त्यांचे मंत्री कसे वागतात हे पाहावं. या संपूर्ण व्यवहारात महसूल खात्याचा गैरवापर करण्यात आला आहे. याप्रकरणी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहिलं आहे. अद्यापही याची दखल घेतली नाही.” ते म्हणाले की, “याची चौकशी नाही तर, या व्यवहाराला स्थगिती दिली पाहिजे.”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.