वृत्तसंस्था / चेन्नई
कन्नड भाषेचीं निर्मिती तामिळ भाषेपासूनच झाली आहे, या आपल्या वादग्रस्त विधानावर क्षमायाचना करण्यास तामिळनाडूचा ज्येष्ठ चित्रपट अभिनेता कमल हासन याने पुन्हा एकदा नकार दिला आहे. त्याने कन्नड भाषिकांची सार्वजनिक क्षमायाचना करावी, अशी मागणी कर्नाटकातील अनेक कन्नड संघटनांनी केली आहे. हासन याच्या विधानामुळे कन्नड भाषा आणि कन्नड जनता यांचा अवमान झाला आहे, असे कन्नड संघटनांचे प्रतिपादन आहे. हासन याच्या या विधानामुळे कर्नाटकात प्रक्षुब्ध भावना निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे.
आपल्या ‘ठग लाईफ’ या चित्रपटाच्या प्रसारण कार्यक्रमात बोलताना, काही दिवसांपूर्वी कमल हासन यांनी हे विधान केले होते. यामुळे कर्नाटकात मोठा गदारोळ उठला आहे. हासन याला या विधानामुळे धमक्याही देण्यात आल्या आहेत, असा आरोप आहे. भारत हे लोकशाहीवादी राष्ट्र आहे. त्यामुळे आपले विचार मोकळेपणाने व्यक्त करण्यास प्रत्येकाला मुभा आहे, असे हासन याने यासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शुक्रवारी स्पष्ट केले.
ठग लाईफवर बंदी
कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेने कमल हासनच्या ठग लाईफ या चित्रपटावर कर्नाटकात बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा चित्रपट कर्नाटक राज्यात दाखविला जाण्याची शक्यता कमी आहे. आपण धमक्यांना घाबरत नसल्याचेही हासन याने स्पष्ट केले आहे. अशा धमक्या अनेकदा आपल्याला आल्या आहेत. पण आपण कधी त्यांना दाद दिलेली नाही, असे त्याचे म्हणणे आहे. त्याच्या विधानामुळे दोन भाषिकांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
चूक नसताना क्षमायाचना नाही
आपल्या विधानावर आपण क्षमायाचना करणार नाही. कारण क्षमा केवळ चूक झाली असेल, तरच मागायची असते. मी कोणतीही चूक केली आहे, असे मला वाटत नाही. त्यामुळे कोणाच्यातरी मागणीवरुन क्षमा मागितली जाणार नाही, अशा अर्थाचे विधान त्याने शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले, अशी माहिती देण्यात आली.