Domestic Violence : पैशांसाठी विवाहितेला घरात डांबून दिले चटके; फुलंब्री तालुक्यातील घटना, अंगावर सतरा जखमा, सहा जणांवर गुन्हा
esakal June 02, 2025 03:45 PM

फुलंब्री : तालुक्यातील चौकावाडी (ता.जि. छत्रपती संभाजीनगर) येथील विवाहितेचा पैशांसाठी छळ करून असह्य वेदना देत घरात डांबून एक-दोन नव्हे; तर तब्बल १७ चटके इलेक्ट्रिक शोल्डरचे दिले. याप्रकरणी हीना शेख यांच्या फिर्यादीवरून सासू-सासरे, पती, दीर आणि दोन नणंदा अशा सहा जणांविरुद्ध रविवारी (ता. एक) फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडिता हीना शेख (वय ३०) हिचे माहेर फुलंब्री असून तिचे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चौकावाडी येथील अजिम अब्दुल शेख याच्याशी आठ वर्षांपूर्वी लग्न झालेले आहे. त्यांना एक पाच वर्षांचा मुलगा आहे. हीनाचा पती अजिम शेख तिला पैशांची मागणी करत सतत शिवीगाळ करत मारहाण करत होता.

दोन वर्षांपासून सातत्याने हीना शेखचा सासरच्या मंडळींकडून छळ सुरू होता. मात्र, तिने दररोजचा त्रास आई-वडिलांना न सांगता वेदना सहन केल्या. माहेरी लग्न असल्याने तिचे वडील तिला घेण्यासाठी गेले होते. यावेळी हीना एका खोलीत डांबून ठेवलेल्या अवस्थेत दिसून आली. विचारपूस केली असता तिने वडिलांना सर्व व्यथा सांगितली.

त्यानंतर हीनाच्या फिर्यादीवरून फुलंब्री पोलिस ठाण्यात पती अजिम शेख, नणंद शबाना निसार शेख (रा. हडको कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर), नणंद रिजवाना इमरान शेख, सासरे अब्दुल शेख, सासू रब्बाना शेख, दीर अजीज शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरातच दोरीने बांधले

पीडिता हीना शेखला गेल्या काही दिवसांपासून राहत्या घरात दोरीने बांधून डांबून ठेवण्यात आले होते. इलेक्ट्रिक शोल्डर गरम करून गळ्यावर, दोन्ही हात-पायांसह शरीराच्या इतर भागांवर सतरा ठिकाणी निर्दयपणे तिला चटके देण्यात आले आहेत. तथापि, गुन्हा दाखल झालेले सहाही संशयित आरोपी फरारी आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथक तयार करण्यात आले.

चौकावाडी येथील घटनेसंदर्भात फुलंब्री पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, ते फरारी आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून पथक तैनात करण्यात आले असून, आरोपींचा शोध घेत आहे.

- संजय सहाणे,

पोलिस निरीक्षक, फुलंब्री

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.