Urulikanchan Crime : लष्कराच्या जवानाला दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून मारहाण; दोघा विरोधात गुन्हा दाखल
esakal June 01, 2025 05:45 AM

उरुळी कांचन - किरकोळ कारणावरून दोन व्यक्तींनी लष्कराच्या जवानाला मारहाण केल्याची घटना उरुळी कांचन येथे शनिवारी (ता. ३१) दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन व्यक्तींवर उरुळी कांचन पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष कृष्णा देशमुख (वय ४३, रा. गडकरी वस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) असे मारहाण झालेल्या लष्कर जवानाचे नाव असून उरुळी कांचन पोलिस ठाण्यात याबाबत देशमुख यांनी फिर्याद दिली आहे.

उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख हे पत्नीसह दुचाकीवरून शनिवारी (ता. ३१) दुपारी साडेबाराच्या सुमारास गाडीत पेट्रोल टाकून उरुळी कांचन गावातून पुणे-सोलापूर महामार्गालगत सेवा रस्त्यावरून घरी जात होते.

यावेळी पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वाराचा देशमुख यांच्या दुचाकीला धक्का लागल्याने देशमुख यांनी 'गाडी हळू चालवा व तुला दिसत नाही का' असे म्हणाले. त्यावर दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या पत्नीसमोर अश्लील शिवीगाळ देत मारहाण करत देशमुख यांच्या अंगातील टी शर्ट फाडला आणि तेथून दोघे पसार झाले.

दरम्यान, संतोष देशमुख हे भारतीय लष्करात हवालदार या पदावर कार्यरत आहेत. ते गुजरात येथील भूज बॉर्डरवर देशसेवा करतात. सुट्टीनिमित्त ते उरुळी कांचन येथे राहत्या घरी आले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.