Maharashtra Live Updates : नाशिकमध्ये कुंभमेळा बैठक सुरु, मुख्यमंत्री शाही स्नानाच्या तारखा जाहीर करणार
Sarkarnama June 01, 2025 08:45 PM
Nashik : सुरक्षिततेसाठी पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच कर्मचारी आणि अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून, कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आली आहे.

Nashik Kumbh Mela : नाशिकमध्ये कुंभमेळा बैठकीला सुरुवात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये कुंभमेळा बैठक सुरु झाली आहे. विविध आखाड्यांचे साधू महंत हेही बैठकीला उपस्थित आहे. या बैठकीत शाही स्नानाच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत.

Nashik Kumbh Mela : मुख्यमंत्री आज शाही स्नानाच्या तारखा जाहीर करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक येथे होणाऱ्या आगामी २०२६-२७ कुंभमेळा नियोजनचा आढावा घेणार आहेत. १३ आखाड्यांच्या साधू महंतांच्या उपस्थितीत शाही स्नानाच्या तारखा आज जाहीर करण्यात येणार आहेत.

CM Devendra Fadnavis in Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाशिकमध्ये आगमन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाशिकच्या ओझर विमानतळ येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचे ग्रंथ देवून स्वागत केले. यावेळी आमदार सीमा हिरे, पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, पोलीस अधीक्षक (नाशिक ग्रामीण) बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, निफाड उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार आदी उपस्थित होते.

Nashik News : नाशिकमध्ये कॉलेजच्या प्राचार्याकडून विद्यार्थींनींचा विनयभंग

नाशिकमधील नामांकित नर्सिंग कॉलेजमधील प्राचार्याने चार विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली. प्रवीण घोलप असे आरोपी प्राचार्याचे नाव आहे. प्राचार्य विरोधात भद्राकली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Sharad Pawar News : बाबा आढाव यांना शुभेच्छा...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कामगार चळवळीतील नेते बाबा आढाव यांचा आज वाढदिवस. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आढाव यांच्या पुण्यातील निवासस्थानी जात त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Supriya Sule News : परीक्षेची संधी द्यावी

पुण्यात भावे हायस्कूलजवळ झालेल्या अपघातात एमपीएससी करणारे तरुण जखमी झाले आहेत. याविषयी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियात पोस्ट केली आहे. या विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामुळे त्यांना कदाचित आजचा पेपर देता येणार नाही. या विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून आणखी एक संधी प्रदान करणे आवश्यक आहे. यासोबतच शासनाने या विद्यार्थ्यांवरील उपचारांचा खर्च करावा जेणेकरून त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही. शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करुन निर्णय घ्यावा, अशी विनंती खासदार सुळे यांनी केली आहे.

CBI Action : लाचप्रकरणी महसूल अधिकाऱ्याला अटक

दिल्लीत सीबीआयकडून केंद्राच्या महसूल विभागातील अतिरिक्त महासंचालकांना लाचप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अमित कुमार सिंघल असे या अधिकाऱ्याचे नाव असून तब्बल २५ लाखांची लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात ते अडकले आहेत. त्यांनी तक्रारदाराकडे टॅक्ससंदर्भातील कामांबाबत ४५ लाख रुपयांची लाच मागितली होती. पैसे न दिल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

रॅगिंग प्रकरणात बी.जे.मेडिकल कॉलेजमधील तीन निवासी डॉक्टर निलंबित

रॅगिंग प्रकरणात बी.जे.मेडिकल कॉलेजमधील तीन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे. सहा महिन्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून निलंबित डॉक्टर यांना महाविद्यालय आणि वसतिगृहात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथ

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागालँडमधील सर्व सात आमदार शनिवारी सत्ताधारी NDPP पक्षात सामील झाले. त्यामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला 60 सदस्यीय विधानसभेत पूर्ण बहुमत प्राप्त झाले. या विलयानंतर, नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) च्या आमदारांची संख्या 25 वरून 32 वर पोहोचली आहे.

शंकर देशमुख बीडचे नवे भाजप जिल्हाध्यक्ष

पुर्वी कॉंग्रेस, मागच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस हे भाजपचे प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष. या पक्षातून आलेल्यांना जिल्हाध्यक्षपद ही भाजपध्ये जणू परंपराच पडली होती. मात्र, २२ वर्षांनंतर भाजपने या परंपरेला छेद देत मुळ पक्षातील कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्षपद दिले आहे. प्रभारी जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांची जिल्हाध्यक्षपदावर निवड करण्यात आली.

पुणे पोलिसांचा मनमानी, मॅरेथॉनसाठी शिवाजीनगर, पाषाण, बाणेर, बावधनमधील रस्ते बंद

पुण्यातील मुख्य रस्ता असलेल्या शिवाजीनगर, पाषाण, बाणेर, बावधनरस्ते पहाटे चारपासून पोलिसांनी बंद केल्याने पुणेकरांचे हाल झाले. वृक्षाथॉन या मॅरेथॉन स्पर्धेसाठी हे रस्ते बंद ठेवण्यात आले होते. मात्र, पर्यायी मार्ग उपलब्ध करून न दिल्याने परीक्षेसाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. काही जणांनची प्लाईट देखील मीस झाली. पर्यायी मार्ग उपलब्ध करून न देता नागरिकांना थांबवून ठेवत दहाच्यानंतर रस्ते सुरू होतील, असे पोलिस सांगत होते. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.