हेरगिरीप्रकरणी अटक : एनआयएने घरात घेतली झडती
वृत्तसंस्था/ गोरखपूर
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सीआरपीएफ जवानाला काही दिवसांपूर्वी सुरक्षा यंत्रणांनी अटक केली होती. तपासादरम्यान या जवानाच्या खात्यात बँकॉक येथील व्यावसायिक पन्नेलालच्या खात्यातून पैसे जमा करण्यात आल्याचे दिसून आले आहे. ही रक्कम आयएसआय एजंटकडून हवालाद्वारे सीआरपीएफ जवानाच्या खात्यात जमा करण्यात आल्याचा संशय आहे. तपास पथकाने पन्नेलालचे हे खाते गोठविले आहे. तसच एनआयएच्या पथकाने खजनी येथील पन्नेलालच्या घरी जात झडती घेतली आहे. घरातील सदस्यांची चौकशी केल्यावर आरोपीचा लॅपटॉप आणि अन्य दस्तऐवज हस्तगत करण्यात आले आहे. तर पन्नेलालच्या मुलाला चार जून रोजी दिल्लीतील कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
सीआरपीएफ जवानाला अटक केल्यावर तपास यंत्रणा त्याच्या बँक खात्याबद्दल चौकशी करत असताना गोरखपूरच्या खजनी येथील रहिवासी पन्नेलालच्या बँक खात्यातून त्याला पैसे पाठविण्यात आल्याचे दिसुन आले. यानंतर एनआयएच्या पथकाने चौकशी केली असता पन्नेलाल बँकॉकमध्ये व्यवसाय करत असल्याचे कळले.
पन्नेलाल हा 5 महिन्यांपूर्वी घरी आला होता. तो बँकॉकमध्sय कुठल्या प्रकारचा व्यवसार करतो हे त्याच्या कुटुंबीयांना सांगत आले नाही. परंतु पन्नेलाल 1992 पासून बँकॉकमध्ये राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
बँकॉकमध्ये हवालाचा खेळ
बँकॉकमध्ये व्याज अन् हवाला व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. जर कुणाला भारतात पैसे पोहोचवायचे असतील तर बँकॉकमध्ये पैसे मिळाल्यावर ते भारतात उपलब्ध करविले जातात. बँकॉकमध्ये एक लाख रुपये मिळाले तर भारतात 90 हजार रुपये दिले जातात.
जवानासंबंधी अधिक तपास
सीआरपीएफ जवानाला देखील अशाच प्रकारे रक्कम मिळाली होती, परंतु यामुळे पन्नेलाल आणि त्याच्या कुटुंबीयांच्या खात्यातून रक्कम हस्तांतरित झाल्याने ते तपासाच्या फेऱ्यात अडकले आहेत. किती रक्कम हस्तांतरित झाली हे एनआयएने अद्याप स्पष्ट केले नाही, परंतु लॅपटॉप आणि अन्य दस्तऐवजांच्या चौकशीनंतर स्थिती अधिक स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.