अजित पवारांच्या पक्षाला झटका : सत्तारुढ पक्षाला पूर्ण बहुमत प्राप्त
वृत्तसंस्था/ कोहिमा
नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 7 आमदार सत्तारुढ नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीत (एनडीपीपी) सामील झाले आहेत. याचबरोबर मुख्यमंत्री नेफ्यू रियो यंच्या नेतृत्वाखालील पक्षाला 60 सदस्यीय विधानसभेत पूर्ण बहुमत प्राप्त झाले आहे. या विलयासोबत विधानसभेत एनडीपीपीचे संख्याबळ 25 वरून वाढत 32 झाले आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. एनडीपीपी आणि भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने 12 जागा जिंकत तिसरे स्थान मिळविले होते.
7 सदस्यांसोबत राज्य विधानसभेत तिसरा सर्वात मोठा समूह राष्ट्रवादी काँग्रेसचे औपचारिक स्वरुपात एनडीपीपीत विलीनीकरण झाले आहे. यावेळी राज्य विधानसभेत 9 पक्ष होते आणि त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस 7 सदस्यांसह विधानसभेत तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष होता. सभागृहाच्या अध्यक्षांनी विलीनीकरणाच्या अर्जाला स्वीकारले आहे. परिणामादाखल राज्य विधानसभेत एनडीपीपीच्या आमदारांची संख्या आता 32 झाली असल्याचे नागालँड सरकारचे प्रवक्ते केजी केन्ये यांनी म्हटले आहे.
लोकांची सेवा करण्याची क्षमता वाढविणार
7 आमदार एनडीपीपीत सामील झाल्याने मुख्यमंत्री डॉ. रियो यांचे नेतृत्व मजबूत होईल आणि लोकांची सेवा करण्याची सरकारची क्षमता वाढविणार आहे. आघाडीत जागावाटपाची व्यवस्था स्थायी नाही आणि भविष्यातील निवडणुकांमध्ये यावर पुनर्विचार केला जाऊ शकतो असे म्हणत केन्ये यांनी एकप्रकारे भाजपला इशारा दिला आहे.
मंत्रिमंडळात फेरबदल शक्य
मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसारख्या राष्ट्रीय पक्षांना राज्य विशिष्ट मुद्द्यांना संबोधित करताना अडचणींना सामोरे जावे लागते. याचमुळे आमदारांचा गट सत्तारुढ पक्षात विलीन करण्याचा निर्णय राज्यकेंद्रीत राजकीय दृष्टीकोनाच्या इच्छेतून प्रेरित होता असा दावाही त्यांनी केला.
विधानसभेतील संख्याबळ
पक्षाचे नाव जागा
एनडीपीपी 32
भाजप 12
एनपीपी 05
लोझॅप (राम विलास) 02
एनपीएफ 02
आरपीआय 02
01 विचारात घेत
अपक्ष 04
एकूण 60