Yermala Crime : गस्तीवाले पोलिस सुस्त, चोरट्यांचे चालले मस्त
esakal June 03, 2025 04:45 AM

येरमाळा - जिल्हा पोलिस प्रशासनाकडून महामार्गावरील चोरट्यांवर निर्बंध घालण्यासाठी गस्त वाढवल्याचे सांगण्यात आले असले तरी राष्ट्रीय महामार्गावरील तेरखेडा येथील उत्तम हॉटेल जवळ काल एका वाहनातून चार दारूच्या बॉक्सची चोरी गेल्याची घटना घडली. यावरून जिल्हा पोलिस प्रशासनाने काय उपाय योजना केल्या,गस्त पथक नेमूनही महामार्गावर रविवारी चोरीचा प्रकार घडला.

विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाची ताडपत्री फाडून वेगवेगळ्या कंपनीच्या दारूचा २४ हजार १०० रुपये किमतीचा माल रविवारी सकाळी सव्वासात ते साडेसात दरम्यान चोरट्यांनी लंपास केला.

तेरखेडा येथील उत्तम हॉटेल जवळ लघुशंकेसाठी थांबलेले असता मागील ताडपत्री फाडून दारू चोरल्याचे लक्षात आल्याचे चालक विवेक गायकवाड (रा. सांगवे मार्डी, ता.जि. धाराशिव) यांनी सांगितले. येरमाळा पोलिस ठाण्यात गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद झाला. पुढील तपास पोलिस नाईक घाडगे करीत आहेत.

गस्त वाढवूनही चोरीची घटना

जिल्हा पोलिस प्रशासनकडून धुळे-सोलापूर महामार्गावर तीन गस्ती पथके कार्यरत आहेत. त्यात आणखी एका पथकाची वाढ करण्यात आली आहे. या गस्ती पथकांना येडशी टोल नाका ते बीड जिल्ह्याची हद्द, येडशी टोलनाका ते तुळजापूर, तुळजापूर ते तामलवाडी (सोलापूर हद्द) या दरम्यानची हद्द विभागून दिली आहे. त्यानुसार पथके रात्री महामार्गावर गस्त घालत आहेत. या पथकात प्रत्येकी एक अधिकारी आणि तीन पोलिस कर्मचारी आहेत. असे असतानाही चोरट्यांनी लूट केली.

येरमाळा ते तेरखेड्यादरम्यान चोरीची शक्यता

मालवाहतूक, प्रवासी वाहनांना लुटणाऱ्या टोळ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ही गस्त वाढविण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली होती. रविवारी तेरखेड्याच्या उत्तम हॉटेलजवळ माल चोरीची घटना लक्षात आली असली तरी सोलापूरकडून बीडकडे जाणाऱ्या येरमाळा ते तेरखेड्या दरम्यान रस्त्यावर चालत्या वाहनातून चोरी घडली असावी, असा अंदाज आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.