वैष्णवीचा नवरा शशांक अन् सासू लता यांच्या अडचणी वाढणार? हगवणे कुटुंबीयांचे जेसीबी मशीन जप्त, तप
Marathi June 03, 2025 11:25 AM

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये पती शशांक आणि सासू लता हगवणेंना (Vaishnavi Hagawane Death) आज म्हाळुंगे पोलीस अटक करणार आहेत, अशी माहिती आहे. वैष्णवीची (Vaishnavi Hagawane Death)सासू आणि नवरा सध्या येरवडा कारागृहात असून सकाळी 10:30च्या दरम्यान या दोघांचा पोलीस घेणार आहेत. जेसीबी व्यवहारात प्रकाश येळवंडे यांची 11 लाख 70 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई होत आहे. तर दुसरीकडे वैष्णवी मृत्यूप्रकरणात हगवणे बाप-लेकाची आणि बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेशची पोलीस कोठडी संपत आहे. त्यामुळं राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे आणि निलेश चव्हाणला आज पुणे सत्र न्यायालयात हजर केलं जाईल. मात्र, हगवणे बाप-लेक आणि निलेशची स्वतंत्र सुनावणी पार पडेल. तसेच म्हाळुंगे पोलिसांकडून अटकेची कारवाई झाल्यानंतर सुशील आणि लता हगवणेंना दुपारी 3 वाजता खेड न्यायालयात हजर केलं जाणार आहेत म्हणजे करिष्मा वगळता आज सर्वांनाच न्यायालयाची पायरी चढावी लागणार आहे. त्यामुळं आजच्या सुनावणीत नेमकं काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी हगवणे माय-लेकावरती जेसीबी मशीनच्या व्यवहारात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचे जेसीबी मशीन जप्त केले. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कारागृहातून त्यांचा ताबा घेण्यासाठी या प्रकरणात म्हाळुंगे पोलीसांकडून प्रोडक्शन वॉरंट काढण्यात आले आहे.

प्रशांत अविनाश येळवंडे (33, रा. निघोजे, ता. खेड) यांनी 29 मे रोजी महाळुंगे यांनी याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शशांक राजेंद्र हगवणे आणि लता राजेंद्र हगवणे (दोघे रा. भुकूम, ता. मुळशी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लता हगवणे हिच्या नावावर असलेले जेसीबी मशीन प्रशांत येळवंडे यांनी खरेदी करण्याचा व्यवहार ठरला. जेसीबीच्या बँक कर्जाच्या हप्त्याची दरमहा 50 हजारांची रक्कम येळवंडे हे शशांकला देत होते. मात्र, त्याने हप्ते न भरता रिकव्हरी एजंटला हाताशी धरून जेसीबी मशीन येळवंडे यांच्याकडून काढून स्वतःच्या ताब्यात घेतले. येळवंडे हे संबंधित रक्कम किंवा मशीनची मागणी करण्यासाठी गेले. त्या वेळी शशांकने पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यात येळवंडे यांना 11 लाख 70 हजार रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्या अटकेसाठी म्हाळुंगे पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंट जारी केले आहे. आर्थिक फसवणूक प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुह्याच्या तपासासाठी शशांक आणि लता यांना ताब्यात देण्यात यावे, असा अर्ज महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयाकडे सादर केला आहे.

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.