ट्रान्सजेंडर जोडप्याच्या मुलाला मिळाली नवी ओळख; उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, आता आई-वडिलांऐवजी म्हणता येणार...
esakal June 03, 2025 05:45 PM

Kerala High Court Verdict : केरळ उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना एका 'ट्रान्सजेंडर' जोडप्याच्या (Transgender Parents) मुलासाठी जन्म प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलंय की, मुलाचे पालक आई किंवा वडील या ऐवजी केवळ 'पालक' म्हणून ओळखले जावेत. न्यायमूर्ती जियाद रहमान ए. ए. यांनी ट्रान्स पुरुष जहाद आणि ट्रान्स महिला जिया पावल यांच्या याचिकेवर हा ऐतिहासिक आदेश दिला आहे.

कोझिकोड महापालिकेला न्यायालयाचा निर्देश

या याचिकेचा निकाल लावताना न्यायालयानं कोझिकोड (Kozhikode Municipal Corporation) फॉर्म ५ मध्ये जन्म प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश दिलेत. या प्रमाणपत्रात वडील आणि आई यासाठी असलेले स्वतंत्र कॉलम हटवण्यात आले आणि याचिकाकर्ते एक आणि दोन यांची नावे 'पालक' म्हणून समाविष्ट करण्यात आली, त्यांचा लिंग उल्लेख न करता. म्हणजेच, आता मुलाच्या जन्म प्रमाणपत्रावर कोणत्याही पालकाच्या लिंगाचा उल्लेख असणार नाही.

जोडप्याने याचिकेत काय केले होते आरोप?

आपल्या याचिकेत जोडप्यानं आरोप केला होता की, स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुलाच्या जन्म प्रमाणपत्रात आवश्यक बदल करण्यास नकार दिला होता. कोझिकोड महापालिकेने दिलेल्या मूळ जन्म प्रमाणपत्रात जहाद यांना वडील (ट्रान्सजेंडर) आणि जिया यांना आई (ट्रान्सजेंडर) म्हणून नमूद करण्यात आले होते. या जोडप्यानं ८ फेब्रुवारी २०२३ रोजी कोझिकोडच्या एका शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आपल्या बाळाचं स्वागत केलं होतं. भारतातला हा पहिलाच असा प्रकार मानला जातो.

कोण आहेत जहाद आणि जिया?

जहाद आणि जिया हे एक 'ट्रान्सजेंडर' जोडपं आहे. जहाद हे ट्रान्स मॅन आहेत (म्हणजे जन्माने महिला होते, पण त्यांनी पुरुष म्हणून स्वतःची ओळख स्वीकारलीये). जिया ही ट्रान्स वुमन आहे (जन्माने पुरुष होती, पण तिने महिला म्हणून स्वतःची ओळख स्वीकारलीये). सुरुवातीला त्यांनी मूल दत्तक घेण्याचा विचार केला होता, परंतु कायदेशीर प्रक्रियेची गुंतागुंत आणि भावनिक भीतीमुळं त्यांनी Biological मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला. जहादनं पुरुष होण्यासाठी सुरू केलेली हार्मोन थेरपी थांबवली आणि स्वतः गरोदर राहून बाळ जन्माला घातले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.