Indore Crime News: इंदौरचे युवा व्यावसायिक राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम काही दिवसांपूर्वी शिलाँगला हनीमूनसाठी गेले होते. मात्र, गेल्या ११ दिवसांपासून ते बेपत्ता होते. अखेर राजा रघुवंशी यांचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे, तर त्यांच्या पत्नीचा शोध अद्याप सुरू आहे. दरम्यान, राजा रघुवंशी यांच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे समोर आले असून, त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
राजा रघुवंशी आणि सोनम यांचा काही दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. त्यानंतर ते शिलाँगला हनीमूनसाठी गेले होते. सुरुवातीला ते कुटुंबीयांच्या संपर्कात होते. मात्र, त्यानंतर त्यांचा मोबाइल फोन बंद झाला. कुटुंबीयांनी अनेकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही.
अखेर कुटुंबीयांनी शिलाँगला जाऊन त्यांचा शोध घेतला, पण कोणताही सुगावा लागला नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. गेल्या ११ दिवसांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. यादरम्यान, दोघांनी भाड्याने घेतलेली गाडी लावारिस अवस्थेत सापडली होती.
दरम्यान, आता पोलिसांना राजा रघुवंशी यांचा मृतदेह सापडला आहे. त्यांच्या शवविच्छेदन अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पूर्व खासी हिल्सचे पोलिस अधीक्षक विवेक सय्याम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालातून त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हत्येसाठी लाकूड कापण्याच्या धारदार शस्त्राचा वापर झाल्याचेही समोर आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, पोलिसांनी हत्येत वापरलेले शस्त्र जप्त केले असून, लवकरच हत्येचे कारण स्पष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. तर राजा रघुवंशी यांच्या कुटुंबाने या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
राजा रघुवंशी यांचा मृतदेह सापडला असला, तरी सोनम अद्याप बेपत्ता आहेत. पोलिसांकडून सोनम यांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाने संपूर्ण इंदौर आणि शिलाँगमध्ये खळबळ उडाली आहे.